जाहिरातींसाठी पालिकेचे धोरण
By Admin | Published: January 7, 2016 01:11 AM2016-01-07T01:11:47+5:302016-01-07T01:11:47+5:30
शहरातील पथदिव्यांच्या खांबांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींमधून उत्पन्न मिळावे यासाठी पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने विशेष प्रस्ताव तयार केला
पुणे : शहरातील पथदिव्यांच्या खांबांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींमधून उत्पन्न मिळावे यासाठी पालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने विशेष प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच होणाऱ्या बीओटी कक्षाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावर २० हजार पथदिव्यांच्या खांबांसाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यातून पालिकेला वार्षिक किमान ९ कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.
आकाश चिन्ह विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी ही माहिती दिली. शहरात पालिकेच्या मालकीचे असे साधारण १ लाख ४० हजार खांब आहेत. त्या सर्व खांबावर आता महापालिकेने टॅगिंग केले आहे. त्यामुळे प्रत्येक खांबाची पालिकेकडे नोंद आहे. या खांबांवर अनेक जाहीरात फलक लावण्यात येतात. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानगी घेणे अपेक्षित आहे. मात्र अशी परवानगी घेतली जात नाही. अनधिकृतपणे फलक लावले जातात. त्यांची संख्या मोठी असल्यामुळे तसेच मनुष्यबळाचा अभाव असल्याने क्षेत्रीय कार्यालयांकडून अनधिकृत फलकांच्या तुलनेत कारवाई मात्र फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यावर उपाय म्हणून आता आकाश चिन्ह विभागाने हे नवे धोरण तयार केले आहे. यात खांबांवरील जाहीरात करण्यासाठी निविदा काढली जाईल.
(प्रतिनिधी)