पोलिसी प्रतापांचा भांडाफोड
By admin | Published: January 22, 2016 01:27 AM2016-01-22T01:27:43+5:302016-01-22T01:27:43+5:30
पोलीस अधिकाऱ्यांना पदानुसार ठरवून दिलेले हप्ते, त्यांच्याकडून होत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.
पिंपरी : पोलीस अधिकाऱ्यांना पदानुसार ठरवून दिलेले हप्ते, त्यांच्याकडून होत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या कारभाराबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेल्या गोपनीय पत्रामुळे पोलिसांचे प्रताप चव्हाट्यावर आले आहेत.
बालाजीनगर झोपडपट्टीतील सुरू असलेल्या मटका अड्डेवाल्याकडून एका अधिकाऱ्याला दरमहा ५० हजार, तर दुसऱ्या अधिकाऱ्याला २५ हजार रुपये मासिक हप्ता मिळतो. महात्मा फुलेनगरमधील मटकेवाल्याकडून अशाच प्रकारे हप्ता मिळतोे. गवळीमाथा येथील मटकेवाल्याकडून एका अधिकाऱ्याला २० हजार, तर दुसऱ्या अधिकाऱ्याला १३ हजार रुपये हप्ता मिळतो. मोशी आणि खडेवस्ती येथून अनुक्रमे १५ आणि १० हजार रुपये हप्ता मिळतो. याशिवाय बेकायदा दारूविक्री करणाऱ्या हॉटेलचालकांची, हातभट्ट्यांची, भंगार माल व्यावसायिकांची यादी पोलिसाकंडे आहे. बक्कळ कमाईचा मार्ग उपलब्ध असल्याने या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलले जात नाही. लाखो रुपयांचा हप्ता मिळू लागल्याने पोलीस या भागातील अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करतात. ही वस्तुस्थिती पोलीस महासंचालकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. गोपनीय पत्राने पोलिसांचा गैरकारभार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या गोपनीय पत्राची
दखल कितपत घेतली जाते? त्यावर पुढील कारवाई होणार की नाही, हे अवलंबून आहे.(प्रतिनिधी)