राजकीय गर्दी चालते, मग सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी का? संवेदनशील व्हा, आमच्याकडेही लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:07+5:302021-07-18T04:09:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आम्ही फक्त ‘एंटरटेनर’ नाही आहोत, संगीत किंवा नाटक असो ते सामाजिक शांततेच्या अवस्थेपर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आम्ही फक्त ‘एंटरटेनर’ नाही आहोत, संगीत किंवा नाटक असो ते सामाजिक शांततेच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाते. त्याच्याकडे तुम्ही निव्वळ मनोरंजन म्हणून बघितले तर गल्लत होईल. त्याच्याकडे समाजाची गरज म्हणून पाहिले तर कलाकार जगतील. ते जगले नाही तर समाजव्यवस्था टिकणार नाही. त्यामुळे थोडं संवेदनशील व्हा, आमच्याकडेही थोडे लक्ष द्या, अशी विनंती प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी सरकार आणि प्रशासनाला केली आहे. राजकीय कार्यक्रमांना गर्दी होते ते चालते, मग सांस्कृतिक कार्यक्रमांना नियम पाळून परवानगी का देत नाहीत, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांसह लग्नसमारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विविध पक्षांचे राजकीय कार्यक्रम सुरू असून, त्या कार्यक्रमांना गर्दी होत असतानाही सरकार आणि प्रशासन मौन बाळगते. इतकं सगळं सुरू आहे, पण नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमानंतर राहुल देशपांडे आणि आनंद इंगळे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
सरकारने कलाकारांकडे लक्ष दिलेले नाही, अशा शव्दांत राहुल देशपांडे यांनी सरकारविरूद्ध नाराजी व्यक्त केली, केवळ पडद्यामागचे कलाकार नाहीत, तर स्टुडिओमध्ये काम करणारे आणि आॅर्केस्ट्रामध्ये गाणारे, वाजवणारे कलाकार असतील. त्यांना सरकारने पैसेच द्यायला हवेत, असे नाही, तर किमान त्यांचा इन्शुरन्स काढावा. आत्ता सरकार खूप काम करतंय, लसीकरण सुरू केलंय. पण राजकीय गर्दी चालते तिथे काणाडोळा होतो, मग आम्ही गायचे की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सगळी खबरदारी घेऊन प्रेक्षक येतोय तर मग नाट्यगृह का सुरू होत नाहीत. चांगली कला, संगीत जगली, तर समाज जिवंत राहतो. सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की आमच्याकडे थोडे लक्ष द्या.
आनंद इंगळे यांनी देखील नाट्यगृह सुरू व्हायलाच पाहिजेत, असे सांगितले. मनोरंजन ही समाजाची मोठी गरज असते. नाट्यगृह सुरू झाल्यानंतर प्रेक्षक येतील की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण आपण प्रयत्नही करायचा नाही ही गोष्ट योग्य नाही. लोकांची गेट टुगेदर चालू आहेत, इतरही कार्यक्रम चालू आहेत. हे सर्व सुरू आहे मग कला क्षेत्र का नाही? सर्व नियमांचे पालन करून आम्ही नाटक करू यासाठी नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी द्या, अशी आमची प्रशासनाकडे मागणी असल्याचे ते म्हणाले.
---------------------------------