मावळात धुमसतेय राजकीय वैमनस्य

By Admin | Published: October 17, 2016 01:26 AM2016-10-17T01:26:36+5:302016-10-17T01:26:36+5:30

खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता

Political discontent in the Mavalya | मावळात धुमसतेय राजकीय वैमनस्य

मावळात धुमसतेय राजकीय वैमनस्य

googlenewsNext


पिंपरी : गतवर्षी कामशेतजवळील खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता. मतदानाच्या दिवशीच झालेल्या या खुनाच्या घटनेनंतर दीड वर्षात खुनाच्या आणखी घटना घडल्या. महिनाभरापूर्वीच तळेगाव नगर परिषदेचे सदस्य व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा कट फसला. हल्ल्याच्या तयारीत आलेले शस्त्रधारी आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने ही घटना टळली. काही दिवस उलटताच रविवारी भरदिवसा तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा निर्घृण खून झाला. मावळात राजकीय वैमनस्य धुमसत असल्याचा प्रत्यय या घटनांतून आला आहे.
तळेगावात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून, त्यांचा उपद्रव वेळोवेळी जाणवतो. सुपारी देऊन खून केल्याच्या घटना तळेगावसह मावळ तालुक्यात घडल्या आहेत. ग्रामपंचायत अथवा नगर परिषदेची निवडणूक असते, त्या वेळी या गुन्हेगारी टोळ्या अधिक सक्रिय होतात. राजकीय वैमनस्यातून घडणाऱ्या घटना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे संकेत देणाऱ्या आहेत. लोकप्रतिनिधी अथवा समाज संघटनाचे काम करणाऱ्यांवर असे हल्ले होत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशा घटनांमुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
२०१० मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा तळेगाव येथे भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी खून झाला होता. शेट्टी यांच्या खुनाच्या खळबळजनक घटनेने राज्यभर तळेगावच्या गुन्हेगारीची चर्चा झाली. मुंबई, पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये खुनाच्या गंभीर घटना घडतात. परंतु त्या घटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये घडत असतात. शहरामध्ये राजकारणी अथवा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्य केले जात नाही. तळेगाव आणि मावळ परिसरात मात्र राजकीय व्यक्तींना टार्गेट केले जात आहे. सुपारी घेणाऱ्या गुंडांच्या टोळ्या या भागात कार्यरत आहेत. या परिसरातील गुन्हेगारी वेगळ्या स्वरूपाची असून, गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागला असल्याचे बोलले जात आहे. मावळातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता रसाळ यांचा सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक होताच राजकीय वैमनस्यातूनच काटा काढला. ग्रामपंचायत ते नगर
परिषद निवडणुकीच्या वेळी
अशा घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
>चार संशयित ताब्यात
सचिन शेळके यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, तळेगावात या प्रकरणामुळे तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला
आहे. तसेच हत्याप्रकणातील हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. रविवारी रात्री शेळके यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी साथीदारांचा तपास सुरू असल्याचे पोलीस सांगितले.
>पोलिसांचे दुर्लक्ष : गुन्हेगारी आळा घाला
मावळ परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आलेला आहे. तळेगाव, कामशेत, लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गृह प्रकल्प विकसित होत आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून धमकावणे, मारामाऱ्या करणे असे गुन्हे वाढू लागले आहेत. वाढत्या गुन्हेगारीकडे ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादानेच मावळ परिसरात भाईगिरी वाढली आहे. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मावळ परिसरात सुजाण नागरिक करीत आहेत.

Web Title: Political discontent in the Mavalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.