पोलीस आयुक्त, अधीक्षकांच्या अधिकारात राजकीय हस्तक्षेप; ‘वेटिंग’चे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 01:54 AM2020-10-11T01:54:45+5:302020-10-11T01:54:57+5:30
Police Transfers News: वाहतूक विभाग हा सर्वाधिक मलईचे पोस्टिंग समजले जात होते. पुण्यात एका सहायक आयुक्तांची बदली थेट वाहतूक शाखा अशी आल्याने तेव्हा चर्चेचा विषय झाला होता.
विवेक भुसे
पुणे : राज्यात सध्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून त्यातील अनेकांच्या बदल्या करण्यात येत आहेत. त्यांची नियुक्ती
न करता त्यांना प्रतिक्षेत ठेवले जात आहे, त्याचवेळी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त यांच्या बदल्या आता आयुक्तालयात न करता थेट परिमंडळात होऊ लागल्या आहेत. यामुळे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांचा संकोच होऊ लागला आहे.
पूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची विशेषत: पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या बदल्या या प्रामुख्याने त्या त्या जिल्ह्यात, पोलीस आयुक्तालयात होत असत. त्यानंतर तेथील प्रमुख त्या अधिकाºयांना कामाच्या सोयीनुसार परिमंडळ अथवा उपविभागीय अधिकारीपदावर नियुक्त करीत असत. मात्र, गेल्या दशकापासून याही नियुक्त्या थेट पदावर होऊ लागल्या. आघाडी सरकारच्या काळात हा प्रकार प्रामुख्याने सुरु झाल्याचे सांगितले जाते.
वाहतूक विभाग हा सर्वाधिक मलईचे पोस्टिंग समजले जात होते. पुण्यात एका सहायक आयुक्तांची बदली थेट वाहतूक शाखा अशी आल्याने तेव्हा चर्चेचा विषय झाला होता. त्यानंतर अशा थेट नियुक्त्या होण्याचे प्रमाण वाढत गेले. या महाविकास आघाडी सरकारमधील पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करताना अनेक अधिकाºयांच्या बदल्या केल्याची तळटीप दिली जात आहे. मात्र त्यांना बदलीचे ठिकाण न देता वेटिंगवर ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळेच असे प्रकार होऊ लागल्याचे सांगितले जात आहे.
‘‘पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना त्यांच्या हाताखालील अधिकाºयांकडून कामे करुन घ्यायची असतात. त्यामुळे कोठे कोणता अधिकारी चांगले काम करु शकेल, हे त्यांना अधिक चांगले माहिती असते. त्यामुळे कोणाची कोणत्या पदावर नियुक्ती केली जावी, हा अधिकार पोलीस आयुक्त, अधीक्षकांचा आहे. या स्वातंत्र्याचा संकोच केला जाऊ नये,’’ -अजित पारसनीस, निवृत्त पोलीस महासंचालक