आध्यत्मिक गुरु येमूल गुरुजीच्या दरबारात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी नियमित लावत होते हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:06 AM2021-07-12T11:06:12+5:302021-07-12T11:06:26+5:30
रघुनाथ येमूल हे सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतात. याच नावाने ते दररोज सोशल मिडियावर दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त सांगत असतात.
पुणे: औंधमधील प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेचे पायगुण चांगले नाहीत, तिच्यामुळे तू आमदार, मंत्री होऊ शकणार नाही, असा सल्ला देऊन तिच्या छळाला कारणीभूत ठरलेल्या आध्यामिक गुरु आणि ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूल यांच्या दरबारात अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी नियमित हजेरी लावत असत. त्यांचा भक्तगणही मोठा आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर पुणे शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रघुनाथ येमूल हे सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतात. याच नावाने ते दररोज सोशल मिडियावर दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त सांगत असतात. ज्योतिषाचार्य म्हणून रघुनाथ येमूल यांची ख्याती आहे. त्यांना आपला हात दाखविण्यासाठी अपॉर्इंमेंट घ्यावी लागते. वैयक्तिक भेट घेऊन हात दाखविण्याचे ते ११ हजार रुपये घेत असल्याचे सांगितले जाते. हस्तरेषा पाहून ते भविष्य सांगतात. कॉपोरेट क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा आहे. अनेक जण त्यांच्याकडून मुहूर्त काढून त्यानंतरच पुढे पाऊल टाकतात. अनेक राजकीय नेते कोणतेही नवीन पाऊल टाकण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतात. प्रशासकीय अधिकारीही आपले भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दरबारात जात असतात. औंधमधील गायकवाड कुटुंबही त्यांचे भक्त बनले होते.
गणेश गायकवाड अजूनही फरार
तुझी पत्नी पांढर्या पायगुणाची आहे. तिचे ग्रहमान दुषित झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार ही होणार नाही व मंत्री ही होणार नाही. त्यामुळे तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा हा तिचेकडून काढून घे. तसेच मी देतो हे लिंबु उतरविल्यानंतर तुझ्या मागची ही पिडा कायमची निघुन जाईल, असे गणेश गायकवाडला सांगितले होते. त्यांच्या भविष्यवाणीमुळेच केदार गायकवाड याने आपल्या पत्नीचा छळ केला. तिला सिगारेटचे चटके दिले. मारहाणीत तिला बहिरेपणा आला. त्यांचा छळ करुन त्यांना घराबाहेर काढले होते.
नानासाहेब व त्यांचा मुलगा गणेश ऊर्फ गायकवाड यांच्याविरुद्ध जमिनी बळकावणे, खंडणी चे हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गणेश गायकवाड याने नुकताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. सध्या गणेश गायकवाड फरार आहे.