मेट्रोवरून राजकीय पक्ष आमनेसामने
By admin | Published: December 5, 2014 05:01 AM2014-12-05T05:01:01+5:302014-12-05T05:01:01+5:30
मान्यतेच्या शेवटच्या टप्प्यावर असलेली मेट्रो आता भुयारी की जमिनीवर, यावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे
पुणे : मान्यतेच्या शेवटच्या टप्प्यावर असलेली मेट्रो आता भुयारी की जमिनीवर, यावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. तर शेवटच्या टप्प्यावर हा घोळ उपस्थित करून प्रकल्पास खो घालण्याचे काम सुरू असल्याची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतली आहे. तर जमिनीवर मेट्रोच्या प्रस्तावास दोन वर्षांपूर्वी मुख्य सभेत मान्यता देणाऱ्या मनसे, शिवसेना व भाजपने भूमिका बदलत चुप्पी साधली आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर सर्वसाधारण सभेने मान्य करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. मेट्रोबाबत असलेल्या सर्व हरकती आणि सूचनांवर चर्चा करून राज्य सरकारने हा डीपीआर अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. सध्या हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी अचानक पुणे मेट्रो भुयारी करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही पुणे मेट्रोबाबत सर्वांची मते जाणून घेऊन विचार केला जाईल, अशी भूमिका घेतल्याने मेट्रो प्रकल्प रखडणार असल्याचे समोर आले आहे. मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या मेट्रो बाबत हा गोंधळ निर्माण झाल्याने सर्वस्तारातून टीकेचा भडीमार होत आहे. विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी जेव्हा मेट्रोचा अंतिम प्रकल्प आराखडा मुख्यसभेत १ विरोधात ८ मतांनी मान्य करण्यात आला. (प्रतिनिधी)