सत्तेसाठी राजकीय पक्षांचे आडाखे

By admin | Published: May 29, 2016 03:49 AM2016-05-29T03:49:27+5:302016-05-29T03:49:27+5:30

महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी २०१७ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आडाखे व मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संभाव्य चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार

Political parties to power | सत्तेसाठी राजकीय पक्षांचे आडाखे

सत्तेसाठी राजकीय पक्षांचे आडाखे

Next

पिंपरी : महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी २०१७ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आडाखे व मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संभाव्य चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार पक्षसंघटन व कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पध्दतीची अधिसूचना शासनाने काढली आहे. त्यानुसार आपल्या राजकीय पक्षासाठी महापालिकेतील सत्तेचे समीकरण जुळवणे सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष आपली राजनिती व धोरणे आखत आहे. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका आणि भूमिपूजन उरकण्याचा सपाटा लावला आहे. तर विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. नागरी प्रश्नांवर आंदोलन, मोर्चे काढून जनतेच्या हिताचा कळवळा दाखविण्याचे प्रयत्न होत आहेत.
देशात आणि राज्यात सत्ता काबीज केलेल्या भारतीय जनता पक्षाने महापालिका स्तरावरसुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा चंग बांधला आहे. भाजपाने पक्षात प्रवेश करणाऱ्यांसाठी महाद्वार खुले केले आहे. अन्य पक्षांतून अनेक जण भाजपात प्रवेश करू लागले आहेत. पक्षात प्रवेश केलेल्यांपैकी काहींना नव्या कार्यकारिणीत महत्त्वाची पदे देण्यात आल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. राज्यात युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली जात आहे. शासनाच्या योजनांचा गवगवा करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे काम भाजपातर्फे सुरू आहे. राज्यात शिवसेनेची भाजपाबरोबर युती असताना स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महापालिका स्तरावर युती होण्याची शक्यता नाही, असे गृहीत धरून स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा शिवसेनेचे पदाधिकारी बोलत आहेत. भाजपाशी सख्य न ठेवता संधी मिळेल, तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते अस्तित्व दाखवून देऊ लागले आहेत. नागरी प्रश्नांवर आंदोलन, मोर्चे यांतून त्यांनी वातावरण ढवळून काढण्यावर भर दिला आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवताना मित्रपक्ष भाजपावरही टीका केली जात आहे.
काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी मिटविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून दखल घेतली. मात्र, अद्याप मनोमीलन झाल्याचे प्रत्यक्षात दिसत नाही. मात्र, शहराध्यक्षांनी युवा संघटनावर जोर दिला आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार आहे. सुमारे ५० हजार मतदार संख्येचा प्रभाग असल्याने मिनी विधानसभा अशी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे मनसे, एमआयएम, आरपीआय, बसपा या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच उमेदवाराचा शोध घेण्याची मोहीम
हाती घेतली आहे. आंदोलन, सभा आणि कार्यक्रम या अस्तित्व दाखविले जात आहे. (प्रतिनिधी)

मिनी विधानसभा : १ प्रभाग ४० हजार लोकसंख्येचा
सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०११च्या जनगणनेनुसार ६४ दोन सदस्यीय प्रभाग व १२८ नगरसेवक आहेत. या काळात कोणताही हद्दवाढ न झाल्यास नव्या चार सदस्यीय प्रभागानुसार नगरसेवकांची संख्या कायम राहून प्रभागांची संख्या ३२ पर्यंत खाली येणार आहे. शिवाय, एका चार सदस्यीय प्रभागात खुला पुरुष, महिला, मागासवर्गीय यांना संधी मिळणार आहे.

Web Title: Political parties to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.