चित्रकारावर ‘राजकीय दबाव’
By admin | Published: June 17, 2016 05:17 AM2016-06-17T05:17:11+5:302016-06-17T05:17:11+5:30
बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा परस्पर राजकीय कार्यक्रमांना देण्याचे उद्योग अद्यापही थांबलेले नसताना आता कलादालनदेखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहे. येत्या १८ व १९
पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा परस्पर राजकीय कार्यक्रमांना देण्याचे उद्योग अद्यापही थांबलेले नसताना आता कलादालनदेखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहे. येत्या १८ व १९ जूनला भाजपाचे अधिवेशन रंगमंदिरात होणार आहे, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार असल्याने पोलीस बंदोबस्ताचे कारण पुढे करीत कलादालनात दि. १८ जूनपर्यंत प्रदर्शन भरविणाऱ्या चित्रकार हरेश पैठणकर यांना दोन दिवसच प्रदर्शन लावण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे. या अशा प्रकारच्या राजकीय दबावामुळे कलाकारांची एकप्रकारे मुस्कटदाबी केली जात असून, पुण्याला खरच सांस्कृतिक शहर म्हणावे का? यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन महिने आधी नाटकांसाठी तारखा बुक करूनदेखील महापालिकेकडून अचानक राजकीय कार्यक्रमांना नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाणे हे प्रकार नित्यनेमाने घडत आहेत, ज्याचा फटका सातत्याने निर्मात्यांना बसत आहे, मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीच पावले उचलली गेलेली नाहीत. महापालिकेने याबाबत नियमावली करण्याचे सूचित केले होते, मात्र ती अद्यापही तयार करण्यात आलेली नाही. आता नाट््यगृहाप्रमाणेच कलादालनदेखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहे. ज्याचा नाहक त्रास कलाकार मंडळींना सहन करावा लागत आहे. येत्या १८ जूनपर्यंत हरेश पैठणकर यांचे ‘रंग सह्याद्रीचे’ हे चित्रप्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कलादालनासाठी दोन महिन्यांपूर्वी त्यांनी बुकिंग केले आहे, तरीही भाजपाच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री येणार असल्याने पोलीस बंदोबस्तासाठी दोन दिवसच प्रदर्शन भरवावे अशी सूचना त्यांना पालकमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. दि. १८ जून हा तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन असल्याने याच दिवशी प्रदर्शनाचा समारोप व्हावा अशी पैठणकर यांची इच्छा आहे, तशी विनंती ते भाजपाच्या वरिष्ठांकडे करणार आहेत. यापूर्वीही ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी कलाकारांना मिळणाऱ्या या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती, तरीही स्थिती ‘जैसे थे’च आहे.
- दोन महिने आधी नाटकांसाठी तारखा बुक करूनदेखील महापालिकेकडून अचानक राजकीय कार्यक्रमांना नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाणे हे प्रकार नित्यनेमाने घडत आहेत, त्याचा फटका निर्मात्यांना बसत आहे.
शनिवार (१८ जून) सुट्टीचा दिवस असल्याने प्रदर्शनाला गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. या दिवशी जरी भाजपाचे अधिवेशन असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रदर्शन पाहायला नक्की येऊ शकतील, कार्यकर्तेही त्याचा लाभ घेतील. हे जरी शक्य झाले नाही तरी अधिवेशनच्या काळात तीन तास हे प्रदर्शन मी बंद ठेवू शकतो.
- हरेश पैठणकर, चित्रकार