राजकारण्यांची लुडबूड नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2015 01:42 AM2015-11-27T01:42:34+5:302015-11-27T01:42:34+5:30
कोणतीही निवडणूक म्हटली की टीका, टिप्पणी, चर्चा होतेच; मात्र, प्राप्त परिस्थितीत हीच सगळ्यात कमी वाईट पद्धत म्हणायला हरकत नाही
पुणे : कोणतीही निवडणूक म्हटली की टीका, टिप्पणी, चर्चा होतेच; मात्र, प्राप्त परिस्थितीत हीच सगळ्यात कमी वाईट पद्धत म्हणायला हरकत नाही. साहित्य संमेलनांमध्ये राजकीय लोकांचा समावेश जरूर असावा; मात्र त्यांची लुडबूड नको, असे मत ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक उल्हास पवार यांनी नोंदवले.
‘संवाद’ या संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तीन अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांचा रसिकांशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी उल्हास पवार अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी सासवडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुुं. शिंदे, स्वागताध्यक्ष विजय कोलते, घुमानमधील संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सुनील महाजन, निकिता मोघे, सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, की प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा रसिक असतो. त्यामुळे त्याला संमेलनाची अभिरुची असणे साहजिक आहे. मात्र, संमेलनामध्ये अध्यक्षाला मानाचे स्थान मिळालेच पाहिजे. आजकाल साहित्य संमेलनाचा होत असलेला सोहळा, उत्सव साहजिक आहे. ते अवाजवी नाही; कारण हा आनंदाचा मेळावा आहे.
श्रीपाल सबनीस म्हणाले, की संमेलनाध्यक्ष निवडणुकीबाबत पराभूतांपेक्षा त्यांच्या समर्थकांच्याच तक्रारी जास्त असतात. तक्रारदारांनी एकत्र येऊन विधायक नियमावली महामंडळाकडे सुपूर्त करावी. यंदा अध्यक्षीय भाषणाशिवाय त्याची एक विशेष मुलाखत घेण्याची सूचना महामंडळाकडे सुचवली आहे.
सदानंद मोरे म्हणाले, की साहित्यिकच एकमेकांना मान देत नाहीत. व्यक्तीला पाठिंबा दिला तर निवडणुकीची गरजच भासणार नाही. त्यामुळे त्याचे मनोगत आशयघन असावे. त्याचे भाषण हा संमेलनानंतरही रसिकांच्या जिज्ञासेचा, कुतूहलाचा विषय असतो. त्यामुळे संमेलनात भूमिका मांडायला त्याला पुरेसा वेळ मिळालाच पाहिजे.
सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीत पार पडायला हवी. कारण, आनंद हे साहित्याचे अधिष्ठान असते. अध्यक्षाला संमेलनानंतरही रसिकांचे प्रेम मिळते आणि तोच त्याचा सन्मान असतो. राजकीय व्यक्तींनी रस दाखवला नाही तर संमेलन होणार नाही, असे मला वाटते. कारण, तोही साहित्यप्रेमीच असतो. साहित्य सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा स्वागताध्यक्षांचा प्रयत्न असतो. त्यामुळे संमेलनांमध्ये साहित्यिक अस्पृश्यता नसावी. - फ. मुं. शिंदे, कवी