राजकारण्यांना खुर्चीची काळजी : दत्तात्रय शेकटकर : ‘जय जवान, जय किसान’ पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:27 PM2017-12-13T12:27:11+5:302017-12-13T12:33:52+5:30
देशभक्तीला राष्ट्रशक्तीचे कवच असावे लागते आणि राष्ट्रशक्तीला देशभक्तीचे अंत:करण असावे लागते, असे मत निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले.
पुणे : राजकारण्यांना देशाची नव्हे, तर खुर्चीची काळजी असते. त्यामुळे देशावर येणाऱ्या संकटांपेक्षा, शत्रूच्या हल्ल्यापेक्षा उद्या आपली खुर्ची वाचणार का, हा प्रश्न त्यांना भेडसावत असतो. देशभक्तीला राष्ट्रशक्तीचे कवच असावे लागते आणि राष्ट्रशक्तीला देशभक्तीचे अंत:करण असावे लागते, असे मत निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केले.
संवाद, पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद कलाकारांचा, संवेदना शेतकऱ्यांची’ या संमेलनाच्या समारोपप्रसंगी निवृत्त मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर यांना ‘जय जवान, जय किसान’ पुरस्कार, तर बारामती येथील स्वाती शिंगाडे यांना कृषिकन्या पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिग्दर्शक भाऊराव खराडे यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि श्यामची आई फाउंडशेनचे अध्यक्ष भारत देसडला यांच्या हस्ते गौैरवण्यात आले. या वेळी सचिन इटकर, सुनील महाजन, निकिता मोघे आदी उपस्थित होते.
शेकटकर म्हणाले, ‘एकोणिसावे शतक सत्तेचे तर विसावे शतक पैैशांचे होते. एकविसावे शतक बुद्धिमत्तेचे आहे. ज्याच्याकडे बुद्धिमत्ता असेल, तो देशावर राज्य करेल. जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे ‘जय जवान, जय किसान’प्रमाणेच आता ‘जय ज्ञान, जय विज्ञान’चा नारा द्यावा लागेल. ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाप्रमाणे क्षमता वाढली की योग्यता वाढते. क्षमता आणि योग्यता वाढली की इरादे बुलंद होतात. भविष्यात पाकिस्तानला अमेरिकेचा त्रास भोगावा लागणार आहे. दहशतवादी जन्माला येत नाहीत, ते तयार केले जातात. भविष्यात मुलांवर योग्य संस्कार झाल्यासच या पिढीला चांगले वळण लागेल. घरातील स्त्री सुरक्षित असेल तर राष्ट्रही सुरक्षित राहील.’
संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.
पी. डी. पाटील म्हणाले, ‘देशाला जवान आणि शेतकरी तारून नेऊ शकतात. त्यांच्या अफाट कार्याची दखल आपण घ्यायला हवी. त्यांचे आयुष्य खूप खडतर असते. बरेचदा सैैन्याला जनतेच्या विरोधात उभे राहावे लागते. अशा वेळी, त्यांना होणारा त्रास शब्दांत सांगणे अशक्य आहे. समाजाने त्यांचा आदर केला पाहिजे.’
भारत कृषिप्रधान देश असून येथे शेतीला दुय्यम स्थान दिले जाते. शेतकरी आत्महत्या करत राहिला तर कृषीच्या पदव्यांचा काय उपयोग? तळागाळातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान अवगत नसते. त्यामुळे सुशिक्षित पिढी शेतीकडे वळली पाहिजे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आत्महत्या कमी होतील. शेतकरी जगला तर जग जगेल.