राजकारणी तिरस्काराचे धनी
By Admin | Published: May 29, 2015 01:00 AM2015-05-29T01:00:32+5:302015-05-29T01:00:32+5:30
पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे इतकेच त्यांचे कार्य असते, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
पुणे : राजकारणी लोक तिरस्काराचे धनी असतात, त्यांना पुरस्कार कधीच मिळत नाहीत, पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे इतकेच त्यांचे कार्य असते, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
श्रींची इच्छा या नाट्य संस्थेतर्फे देण्यात येणारा मोहन वाघ स्मृती पुरस्कार प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते देण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे, यांच्यासह रंगकर्मी बाबा पार्सेकर, गायक त्यागराज खाडीलकर, उल्का चौधरी, मोहन कुलकर्णी, श्रींची इच्छाचे विश्वस्त अविनाश खर्शीकर, अध्यक्ष विजय जोशी तसेच भाऊसाहेब भोईर, भैरवनाथ शेरखाने आदी व्यासपीठावर होते. ठाकरे यांनी मोहन वाघ यांच्या शिस्तबद्ध स्वभावाची आठवण सांंगितली. ते म्हणाले नाट्यवेड्या महाराष्ट्राला त्यांच्याविषयी वेगळे सांगण्याची गरज नाही. ते उत्तम फोटोग्राफर म्हणूनही प्रसिद्ध होते. रंगांची त्यांना चांंगली जाण होती.’’
तीच खरी अभिजात कला
आपणास मिळालेला पुरस्कार वयैक्तिक नसून चित्रकलेतील व्यापक दृष्टीला आहे, तीच व्यापक दृष्टी सध्या कमी झाली आहे, असे नमूद करुन परांजपे सत्काराला उत्तर देताना म्हणाले ज्या कलेत बुद्धी आणि भावनांना आव्हान देण्याची ताकद असते, ती खरी अभिजात कला. प्रत्येक कलाकाराची कला अभिजातच असली पाहिजे.
दृष्य कला सर्वांना जोडणारी आहे. चित्र हा कलेचा समान धागा आहे. चित्रकाराला खडतर स्थितीतून प्रवास करावा लागतो असे फडणीस यांनी सांगितले. जोशी यांनी प्रास्तविक केले. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश खर्शीकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)