पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचे राजकारण तापले : पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 06:03 PM2018-10-20T18:03:31+5:302018-10-20T18:10:04+5:30
कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीला राजकीय वळण मिळाले असून त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले.
पुणे : कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीला राजकीय वळण मिळाले असून त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. भाजप आमदारावर गुन्हा दाखल केल्यामुळे गायकवाड यांची बदली केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या साथीदारांवर ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा राग धरून सरकारने त्यांची बदली केल्याचा आरोप मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे गायकवाड यांची बदली विनंतीनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयाचे राजकारण करू नये असे आवाहन पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी केले आहे.मात्र त्यालाही दाद न देता हे प्रकरण वाढताना दिसत आहे.
पुणेकर म्हणतायेत ''अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड''
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, भाजप आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची केलेली बदली म्हणजे मुख्यमंत्र्याचा पोलिसांच्या कार्यपध्दतीवर विश्वास राहिलेला नाही किंवा त्यांची या प्रकाराला मुक संमती आहे, खंडणीखोरांना व गुन्हेगारांना पाठिशी घालतात, अशी पुणेकरांची भावना आहे. काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, अभय छाजेड, बापू पठारे, माजी महापौर प्रशांत जगताप, राकेश कामठे, नंदा लोणकर, वनराज आंदेकर, भैय्यासाहेब जाधव आदी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.