राजकारणात दांभिकता ठासून भरलेली: विनय सहस्त्रबुध्दे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 07:12 PM2020-01-06T19:12:29+5:302020-01-06T19:13:19+5:30

सामाजिक संस्था, संघटनांसह राजकारणातही सध्या नेतृत्वाची पोकळी...

Politics is filled with hypocrisy: Vinay Sahsrabuddhe | राजकारणात दांभिकता ठासून भरलेली: विनय सहस्त्रबुध्दे 

राजकारणात दांभिकता ठासून भरलेली: विनय सहस्त्रबुध्दे 

Next
ठळक मुद्देअशोक कुकडे यांना राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान

पुणे : सामाजिक कामातील लोकांनीही आखीव-रेखीव असले पाहिजे. केवळ चांगले असून चालत नाही तर चांगले दिसावेही लागते. ‘चारित्र्य’ ही व्यापक संकल्पना आता ‘आऊट ऑफ फॅशन’ झाली असून त्याच्याकडे कालविसंगत संकल्पना असे बघितले जाते. समाजात दांभिकता दिसते. राजकारणात तर ती ठासून भरली आहे. बोलायचे एक आणि करायचे एक, हे लोकांमध्ये रूढ होतेय. हे चित्र बदलायला हवे, अशी अपेक्षा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केली. 
चारित्र्य प्रतिष्ठानतर्फे लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक अशोक कुकडे यांना सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते रविवारी राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संचेती रुग्णालयाचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती, पुणे पिपल्स को- ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे, अ‍ॅड. मंगेश गांधी, श्रीधर गायकवाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश मेहता आदी उपस्थित होते. याप्रसंगी विविध शाळांमधील आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नागरिकता सुधारणा कायद्याचा संदर्भ देत सहस्त्रबुध्दे म्हणाले, ‘कागज नही दिखायेंगे’ असे काही क्रांतीकारी म्हणत आहेत. पण समाजात अनुशासनाला महत्व असते. प्रत्येक ठिकाणी कागदपत्रांची गरज भासत असते. देशभक्ती हा रोजच्या जगण्याचा विषय असतो. संस्थाबांधणी म्हणजे केवळ इमारती उभी करणे नव्हे. तर संस्थेचे समाजाशी असलेले परस्परसंबंध, दीर्घपल्याचा विचार, मिशन अशा विविध मुल्यांचा संस्थाबांधणी म्हणून विचार करायला हवा. यापुढे २०० वर्षांनी सांगण्यासारख्या संस्था आज उभ्या राहत आहेत का, हेही विचारात घ्यायला हवे. नेतृत्त्वशास्त्र हा विषय दुर्देवाने केवळ कॉर्पोरेट क्षेत्रात अधिक बोलला जातो. पण आपल्या घरामध्ये नेतृत्व असते. संस्था, संघटनांसह राजकारणातही सध्या नेतृत्वाची पोकळी दिसून येते. त्यामुळे नेतृत्वशास्त्राची सर्वंकष मांडणी हवी. 
‘नावापुढे देभ असे लिहून देशभक्त होत नाही. ते वागणे, बोलणे, मानसिकतेतून दिसायला हवे,असे हेडगेवार म्हणत. समाज स्वस्थ कसा होईल, हा प्रश्न आहे. आज अनेक विकृती आहेत. सामाजिक प्रदुषण दुर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. परस्पर विचारांमध्ये तफावत असली तरी मैत्री असायला हवी. स्वस्थ समाजाची निर्मिती यातूनच होईल’, असा आशावाद कुकडे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना सन्मानातून प्रोत्साहन मिळत असल्याने असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत, असे डॉ. संचेती यांनी नमुद केले.

Web Title: Politics is filled with hypocrisy: Vinay Sahsrabuddhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.