‘गोविंदबागे’मध्ये राजकीय खलबते? साताऱ्याच्या आमदारांची पवार यांच्यासमवेत गुप्त चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 01:20 AM2018-09-25T01:20:59+5:302018-09-25T01:21:17+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २४) सकाळी बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी राजकीय खलबते रंगली.
बारामती - आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २४) सकाळी बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी राजकीय खलबते रंगली.
सोमवारी सकाळी झालेल्या चर्चेत सातारा जिल्ह्यातील आमदारांनी ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र या भेटीचा तपशील पत्रकारांना सांगण्यास संबंधित आमदारांनी नकार दर्शविला.
या बैठकीत पवार यांच्यासमवेत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार
शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील उपस्थित होते. सकाळी अकराच्या सुमारास सर्वच आमदार गोविंदबाग येथे उपस्थित झाले. ही सभा अत्यंत गोपनीय असल्याने कोणालाच याबाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती. अचानक हे सर्व आमदार बैठकीसाठी पोहोचले. बारामतीमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारीदेखील या बैठकीबाबत अनभिज्ञ होते.
या बैठकीत नेमके काय शिजले, याची माहिती गुप्त ठेवण्यात आली; मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबते झाल्याची चर्चा या वेळी होती. या बैठकीमुळे साताºयातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते पवार यांची राजकीय मुत्सद्देगिरी राजकारणात नेहमीच महत्त्वाची ठरते.
या बैठकीत पवार यांनी
संबंधित आमदारांना कोणता कानमंत्र दिला, याबाबत मात्र आमदारांनी कमालीची गोपनीयता बाळगली.
या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीविषयी चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीचा रोख खासदार उदयनराजे भोसले यांच्या दिशेने होता का, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे; मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
या बैठकीबाबत आमदारांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिल्याने अधिक तपशील समजू शकला नाही. या वेळी बैठक संपल्यानंतर, सर्व आमदार साताºयाच्या दिशेने निघून गेले. मकरंद पाटील यांनी केवळ जिल्ह्याच्या विकासकामांबाबत काही प्रश्नांवर ‘साहेबां’ना भेटण्यासाठी आल्याचे सांगितले. दरम्यान, बैठकीनंतर पवार यांच्या गाडीत बसून रामराजे निंबाळकर व शशिकांत शिंदे पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याचे येथील सूत्रांनी सांगितले.