राजकारण ‘अस्पृश्य’ नाही : लडाखचे युवा खासदार नामग्याल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 11:31 AM2019-10-10T11:31:26+5:302019-10-10T11:32:27+5:30
‘पॉलिटिक्स इज अ डर्टी गेम’ असा काही व्यक्तींंकडून हेतूपुरस्सर प्रचार केला जातो...
पुणे : ‘पॉलिटिक्स इज अ डर्टी गेम’ असा काही व्यक्तींंकडून हेतूपुरस्सर प्रचार केला जातो. पण ‘राजकारण’ हे अस्पृश्य नाही. ते आपल्या आयुष्याशी कायमस्वरूपी जोडलं गेलं आहे. काही राजकीय नेत्यांमुळे सरसकट राजकारणाला वाईट ठरवणं योग्य नाही. राजकारणाच्या पलीकडचे बोला असं का? राजकारणात राहूनच आपण का बोलू शकत नाही? असं असेल तर मग या देशातून राजकारणच नष्ट करा, अशा शब्दांत लडाखचे युवा खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी राजकारणाकडे नाक मुरडणाऱ्या युवा पिढीचे कान टोचले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि संवाद पुणे च्या वतीने ‘पुणे-लडाख ऐतिहासिक मैत्री पर्वा’चा आरंभ नामग्याल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी युवा पिढीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, खासदार गिरीश बापट, डॉ. अब्दुल कलाम फाउंडेशनचे श्रीजन पाल सिंह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजीव पांडे, शेखर मुंदडा, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक संजय चोरडिया, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या निवेदिता एकबोटे, सरहदचे संजय नहार, संवादचे सुनील महाजन आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर उपस्थित होते.
नामग्याल म्हणाले, एकवेळ पक्ष किंवा धर्म वेगळा असू शकतो. पण देश वेगळा असू शकत नाही. देशासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. सोशल मीडियावर केवळ मतप्रदर्शन करणं एवढचं सीमित न राहाता ‘थिंक ग्लोबली अँड अॅक्ट लोकली’, यासाठी सर्वांनीच राजकारणात यायला हवं असं नाही तर देशाला गरिबी, प्रदूषणापासून आपण कसं मुक्त करू शकतो, यासाठी योगदान द्यायला हवं. सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचा काळ आहे. राजकारणापासून फारकत घेऊ नका, स्वत:ला वेगळं ठेवून देश सुधारणार नाही. जिथं विकास आणि भविष्यासाठी योग्य असे राजकीय नेते वाटतात. त्यांच्याबरोबरीने प्रचारात सहभागी व्हा.
सुधीर गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेखर मुंदडा यांनी आभार मानले.
..............
‘पीए’पासून बचके रहेना...
संसदेत जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांची ओळख झाली, तेव्हा ते खासदारांचे पीए म्हणून काम करत होते. ते खासदार झाल्यानंतर त्यांचे पहिलेच भाषण संसदेत गाजले होते. पहिल्याच दिवशी ‘सेंच्युरीवीर’ झाला असल्याची आठवण गिरीश बापट यांनी सांगितली. त्यावर एक कंडक्टर ड्रायव्हर होऊ शकतो तर पीए खासदार होऊ शकत नाही का? ‘पीए’पासून बचके रहेना’ कारण ‘अच्छे दिन’ आले आहेत, असा टोला नामग्याल यांनी बापटांना लगावला.
नामग्याल की ‘नामदेव’
४गिरीश बापट यांनी नामग्याल यांना उद्देशून म्हणाले, की नामग्याल यांचे नाव खूप लांबलचक आहे. त्यापेक्षा त्यांना मी पुण्याचा ‘नामदेव’ म्हणतो.
.......
‘लडाख’ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे, त्याविषयी भाष्य करताना ते पुढे म्हणाले, ‘लडाख’ बर्फाच्छादित असून औषधी वनस्पतीच्या संपदेने नटलेला आहे. मात्र ‘पर्यटक’ केवळ डोंगर दऱ्या, तिथली संस्कृती जाणून घ्यायला येतात. लडाखची नैसर्गिक संपत्ती जपायला हवी. त्याचा ऱ्हास होता कामा नये. लडाखमध्ये या पण शोषण करण्यासाठी नव्हे तर विस्तार करायचा असेल तर या.
........