कर्नाटकी कॉफीने बदलले पुण्याचे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 11:00 PM2019-04-12T23:00:00+5:302019-04-12T23:00:03+5:30
पूना कॉफी हाऊस म्हणजे पुण्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ होते...
पूना कॉफी हाऊस म्हणजे पुण्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ होते. इतक्या गर्दीच्या रस्त्यावर, भर बाजारपेठेत अशी बैठी इमारत म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणीच होती. त्यामुळे तिथे कायम गर्दी असायची. हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पुण्याच्या राजकारणाची तिथे नव्याने मोचेर्बांधणी होत होती.
------------------
डेक्कन चित्रपटगृहाची जुन्या पुणेकरांना अजूनही आठवण असेल. त्याच्या बरोबर शेजारीच एक बैठी इमारत होती. चांगली लांबरूंद अशी! त्या बैठ्या इमारतीचे नाव नाव पूना कॉफी हाऊस. त्याला लागूनच कॅक्टस नावाचा त्याचाच एक भाग होता. एकेकाळी या इमारतीत कर्नाटकी कॉफीचा आस्वाद घेत पुण्याच्या राजकारणावर गप्पा रंगायच्या, इतकेच नाही तर ते कसे करायचे, कोणाला पुढे करायचे, कोणाला मागे घ्यायचे याची मोचेर्बांधणीही इथूनच व्हायची.
सुरेश कलमाडी यांच्या पुण्यातील राजकारणाची सुरूवात इथून झाली. दोन्ही हॉटेलं त्यांचीच. हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात हा व्यवसाय सुरू केला. राजीव गांधी यांच्याबरोबर मैत्री असल्यामुळे राजकारणातही पाय रोवायचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. काळ साधारण १९७९ चा. उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड असे तरूण तूर्क त्यांनी भोवताली जमा केलेले. आणखीनही काही येऊन मिळाले. त्यावेळी महापालिकेत बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक यांचे वर्चस्व होते. त्यांना मानणारे बरेच नगरसेवक होते. मात्र या दोन्ही गटांमध्ये वाद नव्हता. एकत्र येऊन खेळीमेळीने ते महापालिकेचे, पयायार्ने पुण्याचे राजकारण पहात. शरद पवार यांचा तेव्हा राज्याच्या राजकारणात नुकताच कुठे दबदबा वाढत चालला होता.
काही जाणकार सांगतात की पवार यांना राजीव गांधींकडे कलमाडीच घेऊन गेले. ते काय असेल ते असो. पण या पुना कॉफी हाऊस मधून कलमाडी यांनी पुण्याच्या राजकारणात अशी काही काडी फिरवली की त्यानंतरच्या काही वर्षातच गाडगीळ, टिळक यांचे पुण्यातील वर्चस्व कमीकमी होत गेले. शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात पाय रोवले व त्यांच्या साह्याने कलमाडी यांनी पुण्यात बस्तान बसवले. त्यांची कल्पकता याच कॉफी हाऊसमधून बहराला आली. तोपर्यंच्या जुन्या, आळसटलेल्या, पुण्याला त्यांनी कूस बदलायला लावली. थेट दिल्लीतूनच ते अशा काही योजना, असे उपक्रम आणत व पुण्यात त्याची घोषणा करत की सोवळ्या पुण्याला त्याचा जोरदार धक्का बसत असे.
कॉफी हाऊसमध्ये त्यावेळी या सगळ्या बैठका होत असत. रात्री उशीरापर्यंत सुरू असलेले कॉफी हाऊस सकाळीही लवकर सुरू होत असे. दक्षिणी पदार्थ खावेत तर इथेच अशी त्यावेळी डेक्कन परिसरातील नागरिकांमध्ये क्रेझ तयार झाली होती. बाहेर कस्टमर तर आतील बाजूल स्वत: कलमाडी कधी एखाद्याच्या अंगावर ओरडत, कधी त्याचे कौतूक करत, कधी एखादी कामगिरी कोणी फत्ते केली तर त्याच्या पाठीवर थाप मारत राजकारणाचा अड्डा जमवत. थोड्याच कालावधीत कलमाडी यांनी पुण्यात जम बसवला. महापालिकेत त्यांचे वर्चस्व निर्माण झाले. पुण्यात ते म्हणतील ती पूर्व असे होऊ लागले.
त्यानंतर काही वर्षांनी कलमाडी हाऊसचे महत्व वाढले व पूना कॉफी हाऊसचा दबदबा कमी झाला. कलमाडी यांनी मुळ जागा मालकाच्या मागणीवरून जागा त्यांना परत केली. त्यानंतर त्यांनीही त्या जागेचा मुंबईच्या एका बड्या पार्टीबरोबर व्यवहार केला. तो पुर्णत्वाला गेला. पूना कॉफी हाऊस पाडले गेले. तिथे आर डेक्कन नावाचा मोठा मॉल उभा राहिला. मात्र त्या रस्त्याने जाताना अजूनही काही जुन्या पुणेकरांच्या मनात त्या बैठ्या इमारतीच्या स्मृती जाग्या होतात.
(शब्दांकन - राजू इनामदार)