पगडीखाली सुरू झाले राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:20 AM2018-06-12T03:20:28+5:302018-06-12T03:20:28+5:30
निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना जात आठवते, असा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फक्त फुले पगडी घातली जाईल, अशी घोषणा रविवारी केली होती.
पुणे - निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना जात आठवते, असा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फक्त फुले पगडी घातली जाईल, अशी घोषणा रविवारी केली होती. छगन भुजबळ यांचा सुरुवातीला
पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आला होता; मात्र पवारांनी नेत्यांकरवी फुले पगडी आणण्याचे आदेश दिले. सहकारनगर परिसरातून थेट लक्ष्मी रस्त्यावर कार्यकर्त्यांना पाठविण्यात आले. शरद पवार यांचे भाषण सुरू झाल्यावर हा कार्यकर्ता पोहोचला. पवार यांनी पुणे शहराध्यक्ष वंदना चव्हाण आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना बोलावून घेऊन फुले पगडी घालायला लावली.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानेही शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पुणेरी पगडी ही काही कोणत्याही जातीची, समाजाची किंवा धर्माची मक्तेदारी नाही. ती पुण्याची ओळख आहे. जी पगडी घालून शिवाजीमहाराजांच्या सेनापतीने म्हणजेच, पेशव्यांनी अटकेपार झेंडा लावला आणि महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकार केले नव्हे, त्याचे साम्राज्यात रूपांतर केले. त्या पगडीला नाकारून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुण्याचा अपमान केला आहे. त्यांनी पुणे शहराची माफी मागावी आणि मनाचा मोठेपणा दाखवून द्यावा, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे.
भारताचे सर्व पंतप्रधान, राष्ट्रपती, मोठे चेहरे जेव्हा पुण्यात आले, त्यांनी ही पगडी डोक्यावर ठेवणे अभिमान समजला. खुद्द शरद पवार यांनी कित्येकवेळा ही पगडी घातली आहे. मग आताच त्यांना असे काय झाले, असा सवाल दवे यांनी उपस्थित केला आहे.
महात्मा फुले यांच्याविषयी आम्हाला खरंच आदर आहे म्हणून आम्ही त्यांना राजकीय सोय न समजता वंदन करतो. पवारांनी अतिशय हीन राजकारण करीत पुन्हा एकदा स्वत:चे जातीय विषारी स्वरूप दाखवून दिले आहे, असे दवे यांनी म्हटले आहे.