कचऱ्याच्या वक्तव्यावरूनही रंगले राजकारण
By admin | Published: November 8, 2016 01:53 AM2016-11-08T01:53:34+5:302016-11-08T01:53:34+5:30
‘पुणे शहरातील कचऱ्याची लाज वाटते’ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या वक्तव्यावरून राजकारण रंगले
पुणे : ‘पुणे शहरातील कचऱ्याची लाज वाटते’ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या वक्तव्यावरून राजकारण रंगले. महापालिका सर्वसाधारण सभेत त्यांच्या वक्तव्यावरून सोमवारी गदारोळ झाला. खासदार चव्हाण यांचे हे वक्तव्य पुणेकरांचा अवमान करणारे आहे, अशी टीका करीत त्यांचा निषेध करून सभा तहकूब करण्याचा ठराव ३९ विरुद्ध २१ अशा बहुमताने मंजूर करण्यात आला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र पक्षाचेच नगरसेवक सुभाष जगताप यांनी आपण चव्हाण यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे स्पष्ट करून त्याला सुरूंग लावला.
काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन खासदार चव्हाण यांनी शनिवारी महापौर प्रशांत जगताप यांना शहरातील कचऱ्याची समस्या अत्यंत बिकट झाली असल्याचे निवेदन दिले. त्या वेळी बोलताना त्यांनी या शहरातील कचऱ्याची लाज वाटते, असे वक्तव्य केले. सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवातच भाजपाच्या नगरसेवकांनी खासदार चव्हाण यांच्या निषेधाचे फलक फडकावीत केली. महापौरांच्या आसनासमोर जमा होत पक्षाच्या मुक्ता टिळक, वर्षा तापकीर, अस्मिता शिंदे, आदी महिला नगरसेवकांनी गटनेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वखाली घोषणा देण्यास सुरुवात केली. धनंजय जाधव, श्रीकांत जगताप, अशोक येनपुरे, दिलीप काळोखे या नगरसेवकांनी त्यांच्या साथीने लगेचच आरडाओरडा सुरू केला. खासदार चव्हाण यांचा निषेध असो, अशा घोषणा देण्यात येत होत्या.
त्यांना प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर, वैशाली बनकर, संजिला पठारे व अन्य महिला नगरसेवकांनी सभागृह नेते बंडू केमसे यांच्या बरोबरीने चव्हाण यांचे समर्थन करणाऱ्या घोषणा सुरू केल्या. राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी भाजपाचा निषेध सुरू केला. ध्वनिक्षेपकाची पळवापळवी, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, मोठ्याने ओरडणे असे बरेच प्रकार
सुरू झाले. महापौर जगताप, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे याला आवर घालण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
बिडकर यांनी खासदार चव्हाण यांचा निषेध म्हणून सभा तहकूब करावी, अशी सूचना दिली. त्याचे वाचन न करताच महापौरांनी ती स्वीकारत नसल्याचे जाहीर केले. सूचना वाचलीच पाहिजे, त्याशिवाय निर्णय घेता येणार नाही, असे बिडकर म्हणाले. अखेरीस महापौरांनी बोलण्याची संधी देतो, असे सांगून मनीषा घाटे यांचे नाव पुकारले. घाटे यांच्यासह बिडकर, शिंदे, अशोक हरणावळ, वसंत मोरे, वनिता वागसकर आदींनी पुणे शहराचा आम्हाला अभिमान आहे, असे म्हणत खासदार चव्हाण यांचा निषेध केला.राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार त्यांच्या भाषणात अडथळे आणले जात होते. मात्र राष्ट्रवादीच्याच सुभाष जगताप यांनी खासदार चव्हाण यांच्यावर टीका केली. त्याच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही, त्यांनी पुणे शहराचा तसेच कचरा निर्मुलनाचे काम करणाऱ्या हजारो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा अपमान केला आहे असे ते म्हणाले. भाजपच्या सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. नंदा लोणकर, केमसे यांनी चव्हाण यांचे समर्थन केले.