७४८ ग्रामपंचायतींसाठी मतदान १५ जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:28 AM2020-12-12T04:28:34+5:302020-12-12T04:28:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊन यामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे ७४८ ग्रामपंचायतींचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊन यामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे ७४८ ग्रामपंचायतींचा निवडणूक रणसंग्राम अखेर जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. तर १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात निम्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
यंदा मार्च महिन्यात पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे संकट आले. त्यानंतर केंद्र शासनाने लाॅकडाऊन जाहिर केले. यामुळे जिल्ह्यातील एप्रिल ते जून २०२० आणि नंतर जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ७४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या. यामुळे शासनाने या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले. परंतु देशात बिहार निवडणुका झाल्यानंतर व राज्यात पदवीधर, शिक्षक आमदारकीचा निवडणुका झाल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकाचा रणसंग्राम रणसंग्राम गाजणार आहे.
--------
जिल्ह्यातील निवडणुका होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायती
खेड -९१, भोर-७३, शिरूर-७१, जुन्नर-६६, पुरंदर-६८, इंदापूर-६०, मावळ - ५७, हवेली- ५४, बारामती- ५२, दौंड - ५१, मुळशी - ४५, वेल्हा - ३१, आंबेगाव- २९, पिंपरी-चिंचवड- १ , एकूण : ७४८
---------
असा आहे निवडणुकीची कार्यक्रम
- तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे : १५ डिसेंबर
- उमेदवारी अर्ज दाखल करणे : २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर
- उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : ४ जानेवारी २०२१
- मतदान : १५ जानेवारी २०२१
- मतमोजणी : १८ जानेवारी