पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर प्रदूषित हवेने १४ दिवसांत फुप्फुस काळे; 'लंग इंस्टॉलेशन’ हा नवा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 06:28 PM2022-01-10T18:28:55+5:302022-01-10T18:29:03+5:30
२७ डिसेंबर २०२१ रोजी जंगली महाराज रस्त्यावर ‘लंग इंस्टालेशन’ करण्यात आले असून हा उपक्रम क्लिन एअर पुणे अंतर्गत पुणे पालिका व परिसर या संस्थेकडून राबविला जात आहे
श्रीकिशन काळे
पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील हवा देखील प्रचंड प्रदूषित झाली आहे. जंगली महाराज रस्ता हा हिरवागार दिसत असला तरी त्या ठिकाणी मर्यादेच्या पातळीहून अधिक प्रदूषित हवा आपण घेत आहोत. त्यामुळे दररोज संभाजी बागेसमोर बसले तरी श्वासावाटे आपण स्वच्छ नव्हे, तर प्रदूषित धुळीकण फुप्फुसामध्ये घेत आहोत. जेणेकरून आपण आजारांना निमंत्रण देत आहोत. त्यामुळे काही सोपे उपाय केले तर ही प्रदूषणाची पातळी कमी करता येऊ शकते, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
जगातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांमध्ये भारतातील २२ शहरांचा समावेश होतो. एका अभ्यासानूसार २०१९ मध्ये भारतात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी १७ लाख अकाली मृत्यू, म्हणजे मृत्यूसंख्येपैकी १८ टक्के हवा प्रदूषणामुळे झाले आहेत. प्रदूषणाचे हे गंभीर परिणाम दिसत आहेत. स्वच्छ हवा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु, आपल्यामुळेच हवा प्रदूषित होत आहे. आपण किती प्रदूषित हवा घेत आहोत, त्याची माहिती पुणेकरांना व्हावी, यासाठी नुकतेच २७ डिसेंबर २०२१ रोजी जंगली महाराज रस्त्यावर ‘लंग इंस्टालेशन’ करण्यात आले. हा उपक्रम क्लिन एअर पुणे अंतर्गत पुणे पालिका व परिसर या संस्थेकडून राबविला जात आहे.
हे इंस्टालेशन म्हणजे फिल्टर्स व फॅनपासून बनवलेल्या फुप्फुसांची मोठी प्रतिकृती आहे. आपल्या शरीरात फुप्फुसांचे कार्य कसे चालते व श्वासावाटे आत जाणाऱ्या प्रदूषित हवेचा त्यावर काय परिणाम होतो हे ही प्रतिकृती दर्शवते. यासोबतच त्या त्या वेळच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक दाखवते. अशा प्रकारचा उपक्रम जानेवारी २०१८ मध्ये बेंगळुरू या ठिकाणी झाला. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ दिल्लीत झाला. इंस्टालेशनमधील फुप्फुसाच्या प्रतिकृतीचा सुरवातीला रंग सफे असतो. (आरोग्यपूर्ण फुप्फुसे). प्रदूषणाच्या सानिध्यात राहिल्याने हा रंग बदलत जाऊन करडा व काळा होतो.
‘लंग इंस्टालेशन’ म्हणजे काय ?
पुण्यात २७ डिसेंबर २०२१ रोजी जंगली महाराज रस्त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हे लंग इंस्टालेशन झाले. तेव्हा फुप्फुसांचा रंग सफेद होता. पण चौदा दिवसांनंतर हा रंग काळा पडू लागला आहे. यावरून पुणेकर किती प्रदूषित हवा श्वासावाटे आपल्या फुप्फुसात घेत आहेत, ते स्पष्ट होत आहे.
pm 2.5 काय असते ? शहरातील वाढत्या वाहनांमुळे पीएम २.५ मध्ये वाढ होत आहे. पार्टिक्युलेट मॅटर मध्ये अत्यंत सुक्ष्म कण असतात. जे श्वासावाटे आपल्या फुप्फुसात जाऊन रूतून बसतात. रक्तवाहिन्यांमध्ये शिरतात व रक्तावाटे मेंदूसह कोणत्याही अवयवात जाऊ शकतात.
प्रदूषित हवेचे परिणाम काय ?
''हवा प्रदूषणाचे परिणाम डोळे, नाक, त्वचा, श्वसनमार्ग यावर होतात. शिवाय प्रदूषणामुळे मधुमेह, मानसिक आजार, मज्जातंतूशी निगडित अल्झायमर्ससारखे आजार, हृदयाचे विकार, कर्करोग होऊ शकतात. प्रदूषणाची सर्वाधिक झळ वयस्कर माणसे, गरोदर स्रिया, लहान मुले यांना सोसावी लागते. गर्भपात होणे, बाळ कमी वजनाचे निपजणे वा वेळेआधी जन्मणे, बाळामध्ये व्यंग्य असणे असे दुष्परिणाम दिसतात असे फुप्फुसविकार तज्ज डॉ. स्वप्नील कुलकर्णी यांनी सांगितले.''
हवेची गुणवत्ता सुधारणेसाठी काय करावे ?
- वैयक्तिक वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर
- शक्य असेल तेव्हा सायकलने किंवा पायी चालावे.
- शहरातील पादचारी मार्ग, सायकल मार्ग सुस्थितीत हवेत
- नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी जनजागृतीवर भर द्यावा
- प्रदूषण होऊ नये साठी प्रयत्न करावा
- अंत्यविधीसाठी लाकडे जाळण्यापेक्षा इलेक्ट्रिकचा वापर करावा
- ओला व सुका कचरा वेगळा करून रिसायकलिंगसाठी द्यावा.
- कोणताही कचरा जाळू नये