कुरकुंभ एमआयडीसीत प्रदूषण मंडळाचा कारवाईचा धडाका!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 01:01 PM2020-01-18T13:01:59+5:302020-01-18T13:13:27+5:30
प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या प्रकल्पांना उत्पादन बंदचे आदेश
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रदूषण मंडळाला जाग आली असून प्रदूषित रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याच्या कारणावरून विश्वा लॅबोरेटरी प्लॉट नं. डी-३५ या कंपनीलादेखील बंदची नोटीस देण्यात आली आहे. प्रदूषित रासायनिक सांडपाणी व इतर माध्यमातून प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या प्रकल्पांना नियमांचे पालन करण्यापर्यंत उत्पादन बंदचे आदेश प्रदूषण मंडळाकडून देण्यात आले आहे. कुरकुंभ येथील प्रदूषणाच्या पातळीने सर्व स्तर ओलांडले असून, येथील नागरी वस्तीला अतिशय घातक अशा प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी व बेजबाबदार प्रकल्प मालक व व्यवस्थापन यांच्या विरोधात कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी याचे स्वागत केले आहे.
ग्रामस्थांच्या अनेक तक्रारींचा दबाव आल्यामुळे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दि. २ जानेवारी रोजी विश्वा लॅबोरेटरीमध्ये प्रत्यक्षात येऊन पाहणी केली होती. यामध्ये हा प्रकल्प सुरु झाल्यापासून जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत रासायनिक सांडपाणी राजरोसपणे चार गुप्त चेंबरच्या माध्यमातून सोडले जात असल्याचे आढळले होते. घातक अशा रासायनिक सांडपाण्याला कुरकुंभ येथील सामूहिक प्रक्रिया केंद्राने देखील घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रकल्प मालक व व्यवस्थापनाने हे सांडपाणी चेंबरद्वारे सरळ बाहेर उघड्यावर सोडण्याचा सपाटा लावला होता. मात्र, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर प्रदूषण मंडळाला याची दखल घ्यावीच लागली.
..........
वसाहत बनली नागरिकांची डोकेदुखी
दौंड तालुक्याच्या व कुरकुंभच्या विकासाच्या आर्थिक जडणघडणीत आपला मोलाचा वाटा उचलणाºया औद्योगिक क्षेत्राकडून तालुक्यातील व परिसरातील कुरकुंभ व पांढरेवाडी ग्रामस्थांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, जसजसे प्रकल्प सुरु होऊ लागले तशा अनेक समस्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली. यामध्ये प्रदूषणाच्या प्रश्नाने सर्वसामान्यांचे जीवनमान नकोसे करून टाकले असताना ग्रामस्थांनी कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करीत लढा उभारला व अनेक वर्षांच्या संघर्षाला आता यश मिळताना दिसत आहे.
प्रदूषणाच्या अनेक तक्रारी झाल्यानंतर प्रदूषण मंडळाने याची गांभीर्याने दखल घेण्यास सुरुवात केली आहे. याचीच प्रचीती म्हणून अगदी आठवड्याच्या फरकाने आधी हार्मोनी व आता विश्वावर कारवाईचा बडगा उगारला आहे. येणाऱ्या काळात प्रदूषण करणाऱ्या प्रत्येक कंपनीवर कठोर कारवाई करण्याचा मानस प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे.
...........
औद्योगिक क्षेत्रातील कुठलाच उद्योग बंद पडू
नये अथवा त्यांच्यावर चुकीची कारवाई होऊ नये, असे मत प्रत्येक ग्रामस्थाचे आहे. मात्र, प्रकल्प चालवताना व्यवस्थापनाने सभोवताली वास्तव्य करणाऱ्या नागरिकाच्या जीवाशी खेळून आपला प्रकल्प चालवू नये एवढीच अपेक्षा आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक प्रकल्पावर कारवाई होणे आवश्यक आहे. या कारवाईचे आम्ही स्वागत करतो.- राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ
.............