प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली
By admin | Published: November 14, 2015 03:12 AM2015-11-14T03:12:29+5:302015-11-14T03:12:29+5:30
दिवाळीमध्ये आनंदासाठी पुणेकरांनी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीतून झालेल्या विषारी धुरामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या निकषापेक्षा चार पटींनी अधिक वायुप्रदूषण झाले आहे
पुणे : दिवाळीमध्ये आनंदासाठी पुणेकरांनी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीतून झालेल्या विषारी धुरामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या निकषापेक्षा चार पटींनी अधिक वायुप्रदूषण झाले आहे. त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणातही मोठी वाढ नोंदविण्यात आल्याने पुणेकरांची आरोग्य धोक्यात आले.
फटाकेमुक्त दिवाळी साजरी व्हावी, याकरिता अनेक स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून आवाहन करण्यात येत आहे, मात्र तरीही फटाक्यांपासून होणाऱ्या प्रदूषणामध्ये वाढच नोंदविली जात आहे. केंद्र शासनाच्या सफर या संस्थेकडून हवेतील प्रदूषणाची पातळी त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार हवेतील धुळीकणाचे प्रमाण एका घनमीटर जागेत २.५ मायक्रॉन आकाराचे ४० पर्यंत, तर १० मायक्रॉन आकाराचे ६० पर्यंत ठरवून देण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता सफर संस्थेच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या आकडेवारीनुसार २.५ मायक्रॉन आकाराच्या धुळीकणाचे प्रमाण शिवाजीनगरला २४०, कात्रजमध्ये २२४, हडपसरला २४५, लाहगावमध्ये २४६ इतक्या मोठ्या प्रमाणात होते. १० मायक्रॉन आकाराच्या धुलीकणांचे प्रमाण शिवाजीनगरमध्ये २३६, कात्रजमध्ये २१९, हडपसरला २२८, लोहगावमध्ये २१९ इतक्या धोकादायक प्रमाणात नोंदविण्यात आले आहे. दिवाळी व्यतिरिक्तच्या काळात धुलीकणांचे प्रमाण सरासरी १०० पर्यंत असते, त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे.
हवेतील दहा मायक्रॉनपेक्षा मोठी असणारे धुलीकण नाकाची रचना आणि नाकातील केस यामुळे रोखले जातात, मात्र यापेक्षा लहान कण नाकावाटे सहजपणे फुप्फुसात जातात. फटाक्यांच्या आतषबाजीतून निघणाऱ्या धुरामुळे हवेतील १० मायक्रॉन आणि त्यापेक्षा लहान असणाऱ्या धुलिकणांची संख्या खूप जास्त असते. त्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने खूपच धोकादायक आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तीबरोबरच निरोगी लोकांच्या ते जीवावर बेतू शकते.
शहरातील वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने त्याच प्रमाणात धुलिकणांचेही प्रमाण वाढत आहे. यापार्श्वभुमीवर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सह्याद्री इको क्लब यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र तरीही फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरूच आहे.