कुरकुंभकरांना प्रदूषणाचा त्रास, ग्रामीण भागातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:17 AM2017-11-28T03:17:12+5:302017-11-28T03:20:30+5:30
नुकत्याच दिल्लीत झालेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वत्र गोंधळ माजला आहे. देशाची राजधानी व मोठ्या राजकीय उलाढालीचे शहर म्हणून कदाचित दिल्लीतील प्रदूषणावर उच्चस्तरीय उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न झाला.
कुरकुंभ : नुकत्याच दिल्लीत झालेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सर्वत्र गोंधळ माजला आहे. देशाची राजधानी व मोठ्या राजकीय उलाढालीचे शहर म्हणून कदाचित दिल्लीतील प्रदूषणावर उच्चस्तरीय उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न झाला. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात वाढत्या लोकसंख्येने या प्रदूषणाच्या प्रश्नावर आणखीनच गंभीर स्वरूप धारण केले आहे. दिल्लीत पसरणारे धूर व धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. याचाच परिणाम म्हणून अगदी शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या.
याच्या विपरीत परिस्थिती ग्रामीण भागात दिसते. कुरकुंभ (ता. दौंड) येथे असणारा रासायनिक प्रकल्प व त्यातून होणारे जीवघेणे प्रदूषण याबाबत जणू सामान्य माणसाचे जीवन धोक्यात घालण्याचे प्रमाणपत्र मिळाले असल्याच्या दिमाखात येथील कारखानदार व त्यांचे अधिकारी वावरत आहेत.
तीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून येथील नागरिक रासायनिक प्रदूषणाच्या समस्येपासून त्रस्त आहेत. विविध आजार व व्याधी अंगावर घेऊन जीवन व्यतित करीत असताना याकडे राजकीय व प्रशासकीय दुर्लक्ष कसे जाणूनबुजून करण्यात आले याचा प्रत्यय सध्या कुरकुंभ येथील नागरिक घेत आहेत.
केंद्र सरकार एकीकडे नद्या स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून मोठ्या स्वरूपाचे देशपातळीवर योजना-आराखडे तयार करत असून, यावर वेगळ्या मंत्रालयामार्फत काम केले जात आहे. मात्र औद्योगिक मंत्रालयाला लागलेली कुंभकर्णी झोप काही केल्या उडत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्प. गेल्या तीस वर्षांत एकाही उद्योग मंत्र्याने किंवा त्याच्या संबंधातील कुठल्याही उच्चस्तरीय अधिकाºयाने याची दखल घेतलेली नाही.
ग्रामस्थांच्या या लढ्यातून संघर्ष करता करता दुसºया पिढीकडे याचे नेतृत्व आले. मात्र कदाचित याला आता उशीर झाला आहे. कुरकुंभ येथील नैसर्गिक पाण्याचा स्रोत हा कायमचा खराब झाला आहे. कुरकुंभ येथील लोकसंख्या आता पाण्यासाठी परावलंबी झालेली आहे. कुरकुंभ औद्योगिक विकास मंडळाकडून होणाºया पाणीपुरवठ्यावर निर्भर राहावे लागत असून, जवळ असणाºया पाण्याचा वापर करणे शक्य नसल्याचे वास्तव चित्र कुरकुंभ व परिसरात पाहावयास मिळते.
सामाजिक चळवळ उभी व्हावी
पाण्याच्या प्रदूषित होण्याबरोबरच हवेतील प्रदूषणदेखील मोठे आवाहन बनून समोर उभे ठाकत आहे. मोठ्या स्वरूपात होणाºया रासायनिक अभिक्रिया व त्यासाठी विविध रसायनांचा होत असणारा अतिरेक वापर यातून मोठ्या प्रमाणात हवा दूषित होत आहे. मात्र, याचा दुरुपयोग प्रत्यक्ष कुरकुंभ येथील नागरिक व चतुर्थ श्रेणीत काम करणाºया कामगारांना होत आहे.
एकंदरीतच काय, तर शहरी व ग्रामीण भागात होणाºया कारवायांमध्ये किती मोठ्या प्रमाणात फरक असतो हे दिसून येते. त्यामुळे यासाठी लागणारे राजकीय नेतृत्व खंबीर असण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी करणेदेखील आवश्यक आहे.