पोखरी-ढाकाळे रस्त्याचा भराव खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:13 AM2021-08-14T04:13:46+5:302021-08-14T04:13:46+5:30
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी ते ढाकाळे या रस्त्याचा भराव खचल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला ...
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी ते ढाकाळे या रस्त्याचा भराव खचल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा घोडेगाव येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा आदिवासी समाज कृती समिती संस्थापक अध्यक्ष सीताराम जोशी यांनी दिला आहे.
आंबेगाव आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारा पोखरी-ढाकाळे हा रस्ता या वर्षी मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खचून जाऊन रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर काही वर्षांपूर्वी गाडेकरवाडी व सुपेवाडी येथे टाकण्यात आलेले मातीचे भराव मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे हा रस्ता तुटत चालला आहे. तर ठिकठिकाणी गाळाचे साम्राज्य झाल्यामुळे या रस्त्यावरुन जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून, प्रशासन व राजकीय पुढारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आदिवासी समाज कृती समिती संस्थापक अध्यक्ष सीताराम जोशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. रस्त्यावर असलेला चिखल व मोठमोठे खड्डे यामुळे वाहन चालविताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत आहे.
आंबेगाव व खेडच्या तालुक्याच्या हद्दीवर हा रस्ता असल्यामुळे ह्या रस्त्यावर दोन्ही तालुक्यांतील लोकांची नेहमी वर्दळ असते. त्याचप्रमाणे या रस्त्यावर असणारी गाडेकरवाडी, सुपेवाडी, ढाकाळे, श्रीक्षेत्र गडदुबाई देवस्थान, गोहे बु., दांगटवाडीची वस्ती, उभेवाडी, बोरीचीवाडी, सायरखळा, बोरीचीवाडी, पाचवड, भोजणेवाडी, आव्हाट, वाळद, उगलेवाडी ही गावे येत असून, या रस्त्यावरुन ये जा करणारी वाहने ठप्प झाल्यामुळे गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
१३ तळेघर
पोखरी-ढाकाळे या रस्त्याची झालेली दुरवस्था.