कोंढवे धावडेमध्ये रस्त्यावर साचले तळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:30 AM2018-08-28T02:30:53+5:302018-08-28T02:31:19+5:30
खडकवासला मतदारसंघ : वीज, पाणी, रस्त्यांच्या समस्या
कर्वेनगर : खडकवासला मतदारसंघातील कोंढवे धावडे या गावातील दामिनी मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर पाऊस सुरू झाल्यापासून आजपर्यंत पाण्याचे तळे साचले आहे. ते तळे संबंधित प्रशासनाने दुरुस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केलेला दिसत नाही. आजही परिस्थिती तशीच असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे
खडकवासला मतदारसंघातील या रस्त्यावरून कुडजे, मांडवी, आगळंबे, खडकवाडी, अहिरे गावांना वाड्या इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता असल्याने त्यावरून जाताना होडीने जायचे का, असा प्रश्न कोंढवे धावडेचे माजी उपसरपंच अतुलअप्पा धावडे यांनी विचारला आहे. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम अगदी दुय्यम दर्जाचे केले असल्याने रस्ता उखडला आहे.
रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच साचलेल्या पाण्यामुळे खड्डा दिसत नाही आणि अपघात होत आहेत. अनेकदा गंभीर दुखापत होताना दिसत आहे. या ठिकाणी स्थानिक आमदारांनी रस्त्यासाठी निधी टाकला आहे. रस्त्याचे काम चालू करण्यात आले आहे; पण आजही तांत्रिक कारणांमुळे रस्ता अपूर्ण असल्याचे दिसत आहे.
समस्यांनी गांजलेला पश्चिम पट्टा
चांगले रस्ते, स्वच्छ पाणी आणि नियमित वीजपुरवठा या गरजांची अपेक्षा नागरिक लोकप्रतिनिधीकडून ठेवत असतात. पण खडकवासला मतदारसंघातील अनेक ठिकाणी रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचीपण व्यवस्था नियमित होत आहे. भारनियमन तर वळणीच पडले आहेत. या भागातील रस्ते सुव्यवस्थित करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अतुल धावडे यांनी केली आहे