Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत तपास करत राहणार; पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 06:36 PM2021-02-13T18:36:54+5:302021-02-13T18:47:35+5:30
गेले काही दिवस पूजाच्या प्रकरणात पुणे पोलिसांवर प्रचंड टीका होत होती.
पुणे : पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत आम्ही तपास करणार आहोत असा दावा आता पुणेपोलिसांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात कायदेशीर अडचणी असल्यानेच गुन्हा नोंद केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गेले काही दिवस पूजाच्या प्रकरणात पुणे पोलिसांवर प्रचंड टीका होत होती. या प्रकरणात एका मंत्र्याचा हात असल्यामुळेच तपास केला जात नसल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्या पार्श्वभूमीवर तपास सुरु असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.
पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा रविवारी घराच्या बाल्कनीमधून पडुन म्रूत्यु झाला होता. या मुलीचे काही कॅाल रेकॅार्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरुन पूजा ने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केली असल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्याचबरोबर पोलिसही हे प्रकरण दबावामुळे गांभीर्याने घेत नसून पूजाच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॅाप मध्ये अनेक धक्कादायक बाबी असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे होते.
याप्रकरणी बाळगलेले मौन अखेर पोलिसांनी सोडले आहे. लोकमतशी बोलताना पूजा प्रकरणाचा सगळ्या अंगांनी तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऑडिओ क्लिप्स हा गुन्हा नोंद करण्याचा आधार होऊ शकत नाही. तसेच तिच्या कुटुंबीयांनी तक्रार द्यायलाही नकार दिला असल्याने या प्रकरणी तांत्रिक अडचणींमुळे गुन्हा नोंद करता येत नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पूजा पडली त्यावेळी तिच्या सोबत तिचा चुलत भाउ आणि एक मित्र असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ती रहात होती ते घर भाड्याने घेतलेले होते. ती स्पेकन इंग्लिशचा क्लास करायला पुण्यात आली होती आणि गेले आठ दिवस ती या घरात रहात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तपासा दरम्यान घरात मद्याच्या ४ बाटल्या होत्या. तसेच त्यातल्या अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. यावरुन तीने प्रचंड प्रमाणात मद्यप्राशन केले होते ते स्पष्ट झाल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हा नोंद नसल्याने केवळ जबाब घेता आले आहेत आणि कोणताही बेसिस नसल्याने कोणालाही या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले नाही किंवा अटक केली नाही असंही पोलिसांचे म्हणणे आहे.
लोकमतशी बोलताना वानवडीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड म्हणाले , "पूजाचे पोस्ट मार्टम करण्यात आले आहे. तसेच तिच्या सोबत असलेल्या तिच्या चुलत भावाचे आणि मित्राचे जबाबही घेतले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे यात गुन्हा नोंद करता येत नाही. मात्र या प्रकरणाचा पुर्ण उलगडा होई पर्यंत आम्ही त्याचा तपास करणार आहोत. "
दरम्यान घटनेच्या वेळी पूजा गॅलरीत कठड्यावर बसलेली होती आणि तिने मद्यपान केलेले होते. त्यामुळे हा अपघात घातपात की आत्महत्या या सगळ्याच दिशांनी तपास सुरु असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.