Pooja Chavan Death Case: 'साहेब, असल्या गलिच्छ गोष्टीचं समर्थन करणार नाहीत, मी शरद पवारांना भेटणार'
By महेश गलांडे | Published: February 25, 2021 03:56 PM2021-02-25T15:56:33+5:302021-02-25T15:58:52+5:30
Pooja Chavan Death Case: पुण्यात पूजाने आत्महत्या केलेल्या घटनस्थळाची चित्रा वाघ यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रुम सील करण्यात आली असल्याची माहितीत दिली.यानंतर वाघ यांनी वानवडी पोलिसांची भेट घेतली.
पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. राठोड यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय घेता याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. याचवेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणी सरकारवर जबरी टाकी केलीय ''ठाकरे सरकारमध्ये मंत्री वाचला पाहिजे राज्यातील गोर गरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील'' अशा तीव्र शब्दात टीकेची झोड उठवली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास असल्याचंही मत मांडलय.
पुण्यात पूजाने आत्महत्या केलेल्या घटनस्थळाची चित्रा वाघ यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रुम सील करण्यात आली असल्याची माहितीत दिली.यानंतर वाघ यांनी वानवडी पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधत पूजा चव्हाण प्रकरणी राज्य सरकारवर व संजय राठोड यांच्यावर खरमरीत शब्दात जोरदार हल्लाबोल केला. वाघ म्हणाल्या, वानवडी पोलीस निरीक्षक ज्या भाषेत बोलले असे वरिष्ठ अधिकारी पण बोलले नाही. साधा प्रश्न १७ दिवस एफआयआर का नाही? ते म्हणाले ,'लेखी आदेश नाही. पोलीस लेखी आदेशाची वाट बघत आहेत. सुमोटो अंतर्गत का नाही गुन्हा दाखल केला? तसेच पोलिसांना चालवणारा बाप कोण आहे? आणि हत्यारा संजय राठोडला वाचवण्यासाठी तुम्ही सगळं पणाला लावणार का? असा सवाल उपस्थित देखील वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.
संजय राठोड यांनी पोहोरादेवी येथे जमवलेल्या गर्दीचाही चित्रा वाघ यांनी समाचार घेतला. विशेष म्हणजे पोहोरादेवी येथील राठोड यांच्या दौऱ्यानंतर बंजारा समाजातील पाच महंतांपैकी एक महंत असलेले कबीर दास महाराज, ज्यांनी पोहरा देवीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या घरात 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून 5 जणांना लक्षणे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. तुम्ही एवढी माणसं जमवली म्हणजे तुम्ही निर्दोष आहात, असा त्याचा अर्थ होत नाही, असेही त्यांनी म्हटलं.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा वेगळी आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे सगळ्या महिला वर्गाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडची गच्छंती करावी, असे चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तसेच, मी स्वत: शरद पवार यांच्यासोबत काम केलंय. साहेब, असल्या गलिच्छ गोष्टीचं कधीही समर्थन करणार नाहीत. पण, त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देणारे कोण आहेत, हेच पुण्याचे पोलीस. जे पोलीस साधा एफआयआरही करत नाहीत. त्यामुळे, जेवढी काही डिटेलींग आहे, ती घेऊन आम्ही शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार. मला पूर्ण खात्री आहे, हे दोन्ही नेते या घाणेरड्या, गलिच्छ प्रकाराला पाठिंबा देणार नाहीत, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केलाय.
प्रकरण रफादफा करण्यासाठीच पोलीस बसवलेत
12 ऑडिओ क्लिप्स बघून आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आले आहे. अरुण राठोडच्या फोनवर आलेले हे सगळे फोन होते. परंतू, त्याच्या फोनमधला डेटा रिकव्हर का नाही? पुणे पोलिसांनी काही चेक केले का? कसं लपवून, झाकून ठेवायचं हे पुणे पोलिसांनी सिद्ध केले आहे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या भाषेत बोलले आहेत त्यावरून ते पूजा प्रकरण रफादफा करायला बसवले आहे असे वाटते. 17 दिवस उलटून देखील एफआयआर का नाही? या सध्या प्रश्नावर ते म्हणाले ,'लेखी आदेश नाही. पोलीस लेखी आदेशाची वाट बघत आहेत. यावेळी पोलिसांनी या प्रकरणात सुमोटो अंतर्गत का नाही गुन्हा दाखल केला?
वार नसतानाही डॉक्टर का आला
राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही, राष्ट्रीय महिला आयोगाला अहवाल पाठवला. संजय राठोडची चौकशीच नाही, तोवर अहवाल पूर्णच होऊ शकत नाही. मध्यरात्री 100 नंबरला कॉल गेला, मुलगी बिल्डिंगवरून खाली पडली. त्यानंतर सकाळी 7 ते साडे सातला पुन्हा कॉलवरून संपूर्ण माहिती अरुण राठोडकडून घेतली आणि पोलिसांना दिली. तो कॉल पब्लिकमध्ये आणावा. सगळी इत्यंभूत माहिती देऊनही अॅक्शन का नाही. ज्या डॉक्टरांचा वार नव्हता, तो का आला? त्याने पूजाला ट्रीटमेंट का दिली? त्यांनी सांगितले. पुणे पोलिसांनी कोणतीही मदत मागितली नाही, सांगितले नाही. तपास केला आणि निघून गेले. आणि बरोबर दुसऱ्या दिवशी डॉक्टरची आई आजारी पडावी, अरुणच्या घरी चोरी व्हावी केवढे योगायोग आहे बघा.