Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोडला खरंच पोलिसांनी ताब्यात घेतलंय?; जाणून घ्या नेमकं सत्य
By मुकेश चव्हाण | Published: February 18, 2021 02:24 PM2021-02-18T14:24:08+5:302021-02-18T14:29:33+5:30
पूजा चव्हाण प्रकरणाच्या चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे.
पुणे/ मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेल्या अरुण राठोड याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अरुण राठोडची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याचे माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत वानवडी पोलीस स्टेशनमध्ये विचारले असता, पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नसल्याची माहिती संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी 'लोकमत'ला दिली आहे.
पूजा चव्हाणचा मृत्यू पुण्यातील ज्या वानवडी पोलिस स्टेशनमध्ये नोंद आहे, त्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांनी देखील या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही असं सांगितलं आहे. बुधवारी देखील या नम्रता पाटील आणि दिपक लगड या अधिकाऱ्यांनी कोणाला ताब्यात घेतलेले नाही अशीच माहिती दिली होती.
पूजा चव्हाण प्रकरणाच्या चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर मंत्री संजय राठोड यांचे देखील नाव समोर आले आहे. त्यांच्या अरुण राठोड आणि पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गूढ आणखी वाढलं!
वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात ६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. तिच्या शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत उपचार करण्यात आले. नंतर तिला सुटी देण्यात आली. उपचारासाठी दाखल तरुणी नेमकी कुठली हे स्पष्ट झाले नाही. ज्या युनिट २ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. पहाटे तिला दाखल करून उपचार करणे डॉक्टर कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गर्भपात अर्धवट अवस्थेत झाल्यानंतर दाखल तरुणीला काही तासातच रुग्णालयातून सुटी कशी देण्यात आली, हेही एक कोड आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख सहा दिवस रजेवर होते. ते मंगळवार (१६ फेब्रुवारी) पुन्हा सेवेत रुजू झाले. मात्र बुधवारी विभाग प्रमुख रुग्णालयात दिसलेच नाही. या घटनाक्रमाबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. युनिट १ विभाग प्रमुखांच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे त्या तरुणीवरील उपचाराचा उलगडा झालेला नाही. रुग्णालय प्रशासनाकडून कोणीही अधिकृत बोलण्यास तयार नाही.
पूजा चव्हाण भाजपात होती
पूजा चव्हाण हिचं फेसबुक अकाऊंट सर्च केलं असता ती भाजपाच्या बंजारा युवती आघाडीची पदाधिकारी असल्याचं दिसून येतं, तसेच बीड लोकसभा निवडणुकीत खासदार प्रितम मुंडे यांच्यासोबत प्रचार करतानाचेही फोटो आहेत. त्यामुळे पूजा ही भाजपाची कार्यकर्ता होती हे दिसून येते.
संजय राठोड मौन सोडणार?
पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अज्ञातवासात असलेले मंत्री संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. ती अतिशय डॅशिंग होती. १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.