पूजा चव्हाणचा मृत्यू संशयास्पद, उपसभापती निलम गोऱ्हेंनी व्यक्त केली गंभीरता
By महेश गलांडे | Published: February 14, 2021 08:52 PM2021-02-14T20:52:28+5:302021-02-14T20:56:16+5:30
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलम गोऱ्हेंनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला निष्कर्ष काढण्यासाठी वेळ द्यायला हवा.
पुणे/मुंबई - पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस पुरेशा गांभीर्यानं कारवाई करत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही याप्रकरणी चव्हाण कुटुंबीयांवर अन्याय होऊ नये असे म्हटले आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीही, पूजा चव्हाणचा मृत्यू संशयास्पद आहे, तरुणीचा असा मृत्यू होतो ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटलंय.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलम गोऱ्हेंनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला निष्कर्ष काढण्यासाठी वेळ द्यायला हवा. पूजा चव्हाण प्रकरणी ऑडिओ क्लिप viral झाल्या आहेत, त्याचीही सखोल चौकशी होईल” असंही त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की “पूजा चव्हाण प्रकरणी निष्पक्षपाती, सखोल चौकशी होईल. दोषी असेल तर कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, अशी ग्वाही स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिलीय. मात्र, राजकीय भांडवल करून एखाद्याला राजकारणातून उठवायचं असेल तर ते सहन करणार नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय”, याची आठवण निलम गोऱ्हे यांनी करुन दिली. तसेच भाजपा नेत्यांवर टीकाही केली. जर इतका कळवळा असेल तर पूजाच्या कुटुंबीयांना भेटायला कोणी का गेलं नाही?. तसेच, “भाजपचे किमान दहा मंत्री मला माहित आहेत, जे उघडपणे म्हणतात की मी दोन बायका करणारच”, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, धनंजय मुंडे प्रकरणात ज्यांनी आधी तक्रार केली, नंतर त्यांनीच वेगळं वक्तव्य केलं. राजकीय भांडवल किंवा एखाद्याला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे आरोप होऊ नयेत, असे गोऱ्हे यांनी म्हटले.
पूजा बाल्कनीतून पडलीय, आमची बदनामी नको
पूजावर 25 ते 30 लाख रुपयांचं लोन होतं, वडिलाचं चांगलं व्हावं, यासाठी तिने बँकेतून कर्ज घेतलं होतं. या कर्जातून बांधकामही काढलं, पण कोरोना आला अन् होत्याचं नव्हत झालं. या काळात गेल्यावर्षी आम्ही कोंबड्या फुकट वाटल्या, तब्बल 25 लाख रुपयांचा मला लॉस झाला. यात, आम्हाला कुठूनही मदत मिळाली नाही. कसंबसं, आम्ही त्यातूनही उभारलो. पण, बर्ड फ्लू आला अन् पुन्हा आमचा माल केवळ 30 ते 35 रुपये किलोने विकला जाऊ लागला. त्यामुळे आर्थिक संकटं पाठिशीचं होतं, त्यातून पूजाने पुण्याला जायचा निर्णय घेतला. त्यावेळी, मी जाताना तिला 25 हजार रुपयेही दिले, अशी आपबिती पूजाच्या वडिलांनी मुंबई तकशी बोलताना सांगितली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पूजाच्या मित्राचा फोन आला की, ती बाल्कनीतून खाली पडली, मग मी तत्काळ पुणे गाठले पण तिचा मृत्यू झाला होता, अशी वेदनादायी आप बिती पूजाच्या वडिलांनी सांगितली.