पूजा खेडकरने नाव बदलून दिली परीक्षा; ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९ प्रयत्नांची असते मर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 05:41 AM2024-07-16T05:41:14+5:302024-07-16T05:42:03+5:30
पूजा खेडकर यांचे वडील आयएएस अधिकारी नव्हते, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय अधिकारी होते, ही बाब पुढे आली आहे.
पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे यूपीएससीचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर त्यांनी नाव बदलून परीक्षा दिली. तसेच, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी ११ वेळा परीक्षा दिल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मात्र, नियमानुसार या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ६ प्रयत्न असतात, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही मर्यादा ९ आहे. मग, पूजा खेडकर या तब्बल ११ वेळा परीक्षा देऊ शकतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ११ प्रयत्न घेतल्याचे वृत्त व्हायरल होत असले, तरी त्याला दुजोरा मिळालेला नाही.
पूजा खेडकर यांचे वडील आयएएस अधिकारी नव्हते, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय अधिकारी होते, ही बाब पुढे आली आहे. तसेच, पूजा यांनी ‘खेडकर पूजा दिलीपराव’ या नावाने २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’, असे नाव बदलून प्रयत्न संपल्यानंतरही दोन वेळा परीक्षा दिली.
अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी पुण्यातही केले प्रयत्न
पूजा खेडकर यांनी नगरमध्ये सर्वप्रथम २०२१ ला दृष्टिदोष आणि मानसिक आजारी असल्याचे ५२ टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढले हाेते. परंतु, पुन्हा अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे २३ ऑगस्ट २०२२ रोजी लाेकाेमाेटाेर डिसॅबिलिटीचे (गुडघ्याची दुखापत) ७% चे प्रमाणपत्र मिळवले हाेते.
त्यानंतर त्यांनी औंध जिल्हा रुग्णालयात पुन्हा वेगळे प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यांना आधीच अपंगत्व प्रमाणपत्र दिल्याची नाेंद सिस्टममध्ये झाली होती. त्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात आला, अशी माहिती औंध जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डाॅ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.
माझ्यावर लावलेल्या आराेपांबाबत केंद्रीय समितीसमाेर बाजू मांडणार आहे. प्रशिक्षणार्थी असल्यामुळे चाैकशीबाबत मी काेणतीही टिप्पणी करू शकत नाही. माझ्यासाेबत काय हाेत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. जाेपर्यंत आराेप सिद्ध हाेत नाही, ताेपर्यंत काेणीही दाेषी ठरत नाही. मीडिया ट्रायलद्वारे मला दाेषी ठरविणे चूकीचे आहे.
- पूजा खेडकर, प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी