आई-वडील विभक्त असल्याचा पूजा खेडकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 09:25 AM2024-07-12T09:25:06+5:302024-07-12T09:25:22+5:30
मॉक इंटरव्ह्यू व्हायरल; दिलीप खेडकर यांचे अविभक्त कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
अहमदनगर/पुणे : महाराष्ट्र केडरच्या २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे दिव्यांगत्वाचे तसेच नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे. सोशल मीडियावर त्यांचा मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये त्यांनी आई-वडील विभक्त झाल्याचा दावा केला आहे; परंतु त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत अविभक्त कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
नगर जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाकडे पूजा दिलीप खेडकर या नावाने दिव्यांग प्रमाणपत्राची नोंदणी आहे. हे प्रमाणपत्र वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचेच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूजा खेडकर नावाच्या दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद मार्च २०२१ मध्ये समाज कल्याणकडे झालेली आहे. ‘लोकमत’ने जिल्हा रुग्णालयाकडे या प्रमाणपत्राबाबत चौकशी केली असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे म्हणाले, समाज कल्याण विभागाकडे नोंदणी असेल तर हे प्रमाणपत्र आम्हीच वितरित केलेले असेल. ज्या प्रकारचे दिव्यांगत्व असेल त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अगोदर रुग्णाची तपासणी करून दिव्यांगपण तपासतात. दिव्यांगपण ठरवणे ही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचीच जबाबदारी आहे.
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा शोध
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आयएएस होते. ४० कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रात दिसते. पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गात नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र घेतले का? याची तपासणी सुरू असल्याचे प्रांताधिकारी प्रसाद मतेंनी सांगितले.
‘सर्व कागदपत्रे नियमानुसारच’
यासंदर्भात ‘लोकमत’ने पूजा खेडकर यांचे वडील प्रदूषण विभागाचे माजी आयुक्त दिलीप खेडकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, “पूजा यांनी नियमानुसारच दिव्यांग व क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र घेतले आहे. त्याची तपासणी यूपीएससीने केली आहे.” तुमच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असताना क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा प्रश्न केला असता “हे प्रमाणपत्र नियमानेच मिळाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
दिल्ली, मसुरीतही केले कारनामे
खेडकर यांचे प्रताप मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीपर्यंत धडकले आहेत. खेडकर यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या अनागोंदीबाबत अकादमीनेही राज्य सरकारला याबाबत अहवाल देण्यास सांगितले असून, हा अहवाल यूपीएससीला देण्यात येणार आहे.
पोलिसांचीही तक्रार
खेडकर यांची पुण्यात नियुक्ती असताना त्यांना तीन दिवसांसाठी जिल्हा कोषागारात प्रशिक्षणासाठी नेमले होते. तेथेही त्यांनी स्वतंत्र दालनाची मागणी केली. पोलिस अधीक्षकांकडे प्रशिक्षण असताना खेडकर यांना पोलिस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले; मात्र, तेथे न जाता सरकारी गाडी घेऊन भलतीकडेच गेल्या. याचा स्वतंत्र अहवाल राज्य सरकारला पाठविणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.