IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांची जिल्हाधिकाऱ्यांसंदर्भात मानसिक छळाची तक्रार; पुणे पोलीस तपास करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 01:56 PM2024-07-18T13:56:03+5:302024-07-18T13:57:06+5:30
सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकर यांनी वाशीम पोलिसांकडे केली होती, ती पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली
पुणे : पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात मानसिक छळ केल्याप्रकरणी वाशिम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार आता वाशिम पोलिसांकडूनपुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली असून, पुणे पोलिस तपासानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी वाशिम पाेलिसांचे एक पथकदेखील शहरात दाखल झाले हाेते.
वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्याचबरोबर आता या प्रकरणामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचेदेखील नाव पुढे आले आहे. सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकर यांनी केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे केली आहे. त्यानंतर आता ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. पुणे पोलिस याच्या कायदेशीर बाबी तपासत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिस सर्व गोष्टी तपासून पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्याविरोधात राज्य सरकारला अहवाल दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यानंतर आता पूजा खेडकर यांची कार्मिक मंत्रालयाच्या समितीकडून चौकशी केली जात आहे.
मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी पूजा खेडकर यांची आई मनोरमा, वडील दिलीप यांच्यासह सात जणांविरोधात पौड पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पुणे पोलिसांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा अहवाल पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुणे पोलिसांकडून मागवला आहे. मनोरमा खेडकर यांनी मेट्रो रेल्वेचे अधिकारी आणि पोलिसांना दमदाटी केल्याचा व्हिडीओदेखील नुकताच व्हायरल झाला आहे.