OBC कोट्यातून पूजा खेडकर यांचे MBBS; वडील IAS असतानाही नाॅन क्रिमिलेअर काेट्यातून प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 01:42 PM2024-07-15T13:42:02+5:302024-07-15T13:42:35+5:30
नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट त्यावेळी ज्यांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाखांच्या आत त्यांनाच मिळत होते
पुणे: वादग्रस्त आयएएस अधिकारी डाॅ. पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली आहे. त्यासाठी सन २००७ मध्ये त्यांनी एमबीबीएसला ओबीसीतील भटक्या जमाती-३ (एनटीसी-३) या कोट्यातून प्रवेश घेतला होता. विशेष म्हणजे, वडील आयएएस अधिकारी असताना त्यांनी नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जोडले होते. त्यावेळी नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे ज्यांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाखांच्या आत हाेते त्यांनाच मिळत हाेते.
खेडकर यांनी आयएएस हाेण्यासाठी यूपीएससीकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे. त्या काेट्यातून त्यांना नाेकरीही मिळाली; परंतु वैद्यकीय प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिलेले नाही. मग यूपीएससीच्या वेळीच त्यांना अपंगत्व आले होते का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावेळी खेडकर यांना सीईटीमध्ये २०० पैकी १४६ गुण मिळाले. त्याआधी दहावीला ८३ टक्के व बारावीला ७४ टक्के गुण मिळाले आहेत. दरम्यान एमबीबीएसचा साडेपाच वर्षांचा डिग्री अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे येथील अधिकारी सांगतात.
दरम्यान त्यांची आयएएसपदी नियुक्ती झाली. पुण्यात त्यांचे प्रोबेशन (प्रशिक्षण) सुरू असताना खासगी ऑडी कारला लाल-निळा दिवा आणि ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्डही त्यांनी गाडीवर लावला होता. याशिवाय सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर देण्यात यावे, तसेच सरकारी कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी असावेत, अशी मागणी केली होती. यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे; परंतु खेडकर यांच्याबाबत रोजच नवनवे खुलासे समोर येत आहेत.
पूजा खेडकर यांनी सन २००७ मध्ये आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेतला हाेता आणि ती डिग्री पूर्ण केलेली आहे. त्यावेळी सीईटीद्वारे प्रवेश देण्यात आला हाेता. त्यावेळी त्यांना एनटीसी-३ या प्रवर्गातून प्रवेश दिला आहे, तसेच त्यावेळचे नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे. साेबत जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देखील जोडलेले आहे. - डाॅ. अरविंद भाेरे, वैद्यकीय संचालक, काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, नऱ्हे