IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर जबाब नोंदवण्यास उपस्थित नाहीत; पुणे पोलिसांकडून दुसऱ्यांदा समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:32 PM2024-07-19T17:32:31+5:302024-07-19T17:34:21+5:30
पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. मात्र, खेडकर पुण्यात जबाब नोंदवण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला
पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळ केल्याची तक्रार केली असून, वाशिम पोलिसांकडून हे प्रकरण पुणेपोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणात पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. मात्र, खेडकर पुण्यात जबाब नोंदवण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे.
खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे छळ झाल्याची तक्रार दिली आहे. हा प्रकार पुण्यातील असल्यामुळे पुढील चौकशीसाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यासाठी वाशिम पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले होते. आता याबाबतची चौकशी पुणे पोलिस करणार आहेत. याप्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. खेडकर यांनी पुण्यात येऊन पोलिसांकडे जबाब नोंदवावा, असे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, खेडकर समन्स बजावल्यानंतर उपस्थित न राहिल्याने त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
प्रशिणार्थी असताना खेडकर यांनी खासगी आलिशान कारला अंबर दिवा लावला. कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. त्यांनी बैठकीसाठी स्वतंत्र दालन,घेतले, तसेच शिपाईही घेतले. प्रशिक्षणार्थी खेडेकर यांच्या बडेजावपणाचे प्रकार उघडकीस आले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालायातील अधिकाऱ्यांनी तक्रार केली. खेडकर प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी दिवसे यांनी राज्य सरकारकडे पाठवला. त्यानंतर खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. खेडकर यांनी दिवसे यांच्याविरोधात छळवणूक केल्याची तक्रार वाशिम पोलिसांकडे दाखल केली असून, त्याचा तपास पुणे पोलिस करत आहेत.