Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; दिल्लीच्या गुन्हे शाखेचा पुण्यात येऊन तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 01:12 PM2024-08-21T13:12:36+5:302024-08-21T13:13:23+5:30
खेडकरने शासनाची जी फसवणूक केली आहे, त्याबाबत दिल्ली पोलिसांनी कसून तपास सुरू
पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यासाठी दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक पुण्यात दाखल झाले असून, पथकाने दिव्यांग प्रमाणपत्र मिळविलेली रुग्णालये तसेच पूजा खेडकरच्या सर्व रहिवासी पत्त्यावरील सोसायट्यांच्या रहिवाशाकडे जाऊन चौकशी केल्याचे समजते. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तक्रारीवरून दिल्लीपोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा पूजा खेडकरवर दाखल केला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या १२ वेळा परीक्षा देऊन खेडकर हिने आयोगाची फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण विभागाने तिला नोटीस बजावली होती. मात्र, या नोटिशीचे तिच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नव्हते. विभागाने तिला पुन्हा एकदा नोटीस बजावून तिला १४ ऑगस्टची मुदत दिली होती. त्यानुसार तिला नवी दिल्लीत विभागाचे सहसचिव रजत कुमार यांच्यासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही तिच्याकडून उत्तर न मिळाल्याने विभागाने मसुरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमार्फत पुण्यातील यशदाच्या संचालकांना पत्र पाठवण्यात आले होते. ही नोटीस पूजा खेडकरच्या पुणे व भालगाव (ता. पाथर्डी जि. नगर) येथील घराला लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार खेडकर हिच्या पुण्यातील पाषाण येथील बंगल्यावर ही नोटीस लावण्यात आली. ही नोटीस प्रत्यक्षात कोणीही स्वीकारली नसल्याने बंगल्याच्या बाहेर लावल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. या नोटिशीनुसार खेडकर हिला आपले म्हणणे सादर करण्यासाठी १६ ऑगस्टची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, तिने नोटिशीला अद्यापही उत्तर दिलेले नाही. खेडकर हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाने बडतर्फ केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी (दि. २१) होणार आहे. दरम्यान, पूजा खेडकर हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. खेडकरने शासनाची जी फसवणूक केली आहे, त्याबाबत दिल्ली पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार आहेत.