अमेरिकेत शिक्षण घेत असताना फोनवरून पूजा पाठ; उच्चशिक्षित तरुणीला १८ लाखाचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:40 PM2024-08-21T12:40:07+5:302024-08-21T12:40:22+5:30
पिंपरी चिंचवड परिसरात बोलावून त्यांचा सोन्याचा हार आणि सोन्याच्या बांगड्या असा ५ लाख ५९ हजाराचा ऐवज त्यांच्याकडून काढून घेतला
किरण शिंदे
पुणे: २१ वर्षीय तरुणी.. उच्चशिक्षित.. अमेरिकेच्या शिकागोत शिक्षण घेते.. मात्र ती एका भोंदू बाबाच्या नादी लागली आणि स्वतःचं लाखो रुपयाचं नुकसान करून बसली. हा प्रकार घडलाय पुण्यात.. डेक्कन परिसरातल्या नळ स्टॉप येथे. डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम ४०६, ४२० आणि ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ अभयकुमार आमळे (रा. ९०४, स्मृती आनंद विजय नगर काळेवाडी पिंपरी चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. नोव्हेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी या अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी शिक्षण असताना आरोपीने फोनवरून अध्यात्माद्वारे पूजापाठ आणि जप करून फिर्यादी सह त्यांच्या घरातील अडचणी सोडवतो असे सांगितले. यासाठी आरोपीने फिर्यादी कडून पैसे घेतले. पूजा झाल्यानंतर हे पैसे परत देतो असे आश्वासनही दिले. त्यानुसार आरोपीने फिर्यादी यांच्याकडून ११ लाख ८३ हजार रुपये घेतले. याशिवाय फिर्यादी जेव्हा भारतात परत आल्या तेव्हा त्यांचे महागडे कपडे असतील बॅगही आरोपीने घेतली. फिर्यादीला पिंपरी चिंचवड परिसरात बोलावून त्यांचा सोन्याचा हार आणि सोन्याच्या बांगड्या असा ५ लाख ५९ हजाराचा ऐवज त्यांच्याकडून काढून घेतला. याशिवाय रोख २ लाख ८२ हजार रुपये देखील काढून घेतले.
दरम्यान या सर्व घटनेनंतर फिर्यादीने आरोपीकडे आजवर दिलेली रोख रक्कम आणि दागिने परत मागितले असता आरोपीने फिर्यादीचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी त्यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.