पूजाची मृत्यूशी झुंज अखेर संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:39 AM2017-07-24T02:39:20+5:302017-07-24T02:39:20+5:30
रेल्वे अपघातात जखमी झालेल्या पूजाची मृत्यूशी झुंज अखेर संपली. आठवडाभरापूर्वी रेल्वे अपघातात ती जखमी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : रेल्वे अपघातात जखमी झालेल्या पूजाची मृत्यूशी झुंज अखेर संपली. आठवडाभरापूर्वी रेल्वे अपघातात ती जखमी झाली होती.
पूजा नारायण डोळे (वय २१ वर्षे) असे तिचे नाव आहे. मांजरी येथील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर महाविद्यालयाचा पहिला दिवस तिचा अखेरचा दिवस ठरला.
गेल्या आठवड्यात सोमवारी (दि. १७) पूजा महाविद्यालयाचा पहिला दिवस उरकून मांजरी रेल्वेस्थानकावर आली. दुपारी पावणेतीनच्या दरम्यान पुण्यावरून दौंडकडे जाणाऱ्या डेमूमध्ये केडगावला जाण्यासाठी चढत असताना पूजा पाय घसरून पडली. या स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने तिच्या पायाला व घोट्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तत्काळ शालेय विद्यार्थ्यांनी व युवकांनी तिला लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. पायावर व गुडघ्यावर शस्रक्रिया करुनसुद्धा ती उपचारास प्रतिसाद देत नव्हती. अखेर आज रविवारी (दि. २३) सकाळी १0 वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर शवविच्छेदनानंतर सायंकाळच्या सुमारास मृतदेह केडगाव येथे आणण्यात आला.
अंत्यदर्शनानंतर तिचे मूळ गाव गुळज (ता. गेवराई बीड) येथे अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यात आला. पूजा लहानपणापासून हुशार व मनमिळावू स्वभावाची होती. जवाहरलाल विद्यालयाचे उपशिक्षक नारायण डोळे यांची ती कन्या होती. तिच्या पाठामागे आई, वडील व एक छोटा असा परिवार आहे.
नुकसानभरपाईची मागणी
पूजाचा मृत्यू डेमू गाडी चढताना झाला आहे. विशेष म्हणजे मांजरी येथील प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने ती पडल्याने गंभीर जखमी झाली. तिच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.