पूजाअर्चा आता पूर्वीप्रमाणेच ‘ऑफलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:00+5:302021-06-23T04:08:00+5:30
पुणे : मंत्र उच्चारांमधून घरात आणि वातावरणात एकप्रकारे सकारात्मक ऊर्जा कार्यान्वित होत असल्याने धार्मिक कार्यासाठी गुरुजी हवेतच, अशी ...
पुणे : मंत्र उच्चारांमधून घरात आणि वातावरणात एकप्रकारे सकारात्मक ऊर्जा कार्यान्वित होत असल्याने धार्मिक कार्यासाठी गुरुजी हवेतच, अशी एक सर्वसामान्यांची धारणा असते. कोरोनाकाळातील पूजाअर्चेसाठी नाइलाजाने ‘ऑनलाईन’चा पर्याय स्वीकारण्यात आला. मात्र, आता गुरुजींना घरी बोलावून धार्मिक विधी करण्यास सर्वधर्मीय पुणेकर प्राधान्य देऊ लागले आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत बहुतांश लोकांना इंटरनेट कनेक्शन जाणे, मोबाईल हॅंग होणे, वीजपुरवठा खंडित होणे, उच्चार स्पष्ट ऐकू न येणे यांसारख्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांना धार्मिक कार्याचा म्हणावा तसा लाभ मिळाला नसल्याने मंगलकार्य लांबणीवर ढकलावी लागली. शासनाने निर्बंध काहीसे शिथिल केल्यानंतर रितसर गुरुजींना आमंत्रित करून शासन नियमानुसार धार्मिक आणि मंगलकार्य करण्याकडे बहुतांश यजमान पसंती दर्शवत आहेत.
सत्यनारायण पूजा, लघुरूद्र, मंत्रजप, देवीकवच पठण, लग्न, मुंज यांसह वास्तुशांत, गृहप्रवेश आदी सर्व विधी पारंपरिक पद्धतीनुसार ‘ऑफलाईन’ सुरू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व व्यवहार ऑनलाईन करण्याकडे ओढा वाढला असला, तरी मंगलकार्य ही गुरुजींच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होत नाहीत ही एक मानसिकता जनमानसात रुढ झालेली आहे. गतवर्षी उच्चशिक्षित वर्गाने ‘ऑनलाईन’ अथवा कॅसेट लावून धार्मिक कार्य पूर्णत्वास नेले. मात्र, बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी कोरोनाकाळात मुंज, लग्नासारखी मंगल कार्ये पुढे ढकलली. त्यामुळे गुरुजींना ऑनलाईन कार्याला प्रतिसाद काहीसा अल्प मिळाला.
अंत्यविधींमध्ये काहींनी पाच जणांच्या उपस्थितीत पिंडदान आणि श्राद्धविधी पूर्ण केले. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आणि पन्नास लोकांच्या उपस्थितीत धार्मिक आणि मंगल कार्याला परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता गुरुजींचे फोन सातत्याने खणखणू लागले आहेत.
चौकट
नियमांचे काटेकोरपणे पालन
घराघरांत किंवा सोसायट्यांमधील धार्मिक कार्यांमध्ये गुरुजींकडून नियमांचे पालन केले जात आहे. स्वत:ची सुरक्षितता लक्षात घेऊन यजमानांना मास्क परिधान करायला लावणे, लहान मुले आणि घरातील ज्येष्ठांना पूजा स्थळी येण्यास मनाई करणे, सामाजिक अंतर राखणे अशा सूचना यजमानांना देण्यात येत आहेत. ज्यांना धुराचा त्रास आहे अथवा तो होऊ नये याकरता धूप किंवा उदबत्यांचा वापर कमी झाला आहे. हात पुसण्यासाठी स्वत:चा नॅपकीन, पंचा अथवा यजमानांकडून ‘टिश्यू पेपर’ मागितला जातो, असे पुरोहितांनी सांगितले.
चौकट
“सध्या सर्व पूजा अर्चा, यज्ञ यांसारखी धार्मिक कार्ये ‘ऑफलाईन’ होत आहेत. कोरोनाकाळात ऑनलाईन पूजेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रत्यक्ष गुरुजींना बोलावून धार्मिक कार्य करून घेण्याची लोकांची पूर्वापार चालत आलेली मानसिकता कायम आहे.”
- घनश्याम हिंगणे, गुरुजी
चौकट
“माझ्या मुलीचे लग्न फेब्रुवारीत होणार होते. पण, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्ही ते पुढे ढकलले. लग्नामध्ये विधी सांगायला गुरुजी आणि किमान लोकं तरी हवीत ही इच्छा होतीच. दोन दिवसांपूर्वी शासन नियमांचे पालन करून लग्नकार्य गुरुजींच्या उपस्थितीत केले.”
-विलास छत्रे, वधू पिता.