कुमशेत-शिरोली रस्त्यावरील पूल धोकादायक
By admin | Published: May 9, 2017 03:28 AM2017-05-09T03:28:54+5:302017-05-09T03:28:54+5:30
जुन्नर तालुक्यातील अष्टविनायकातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्र ओझर व लेण्याद्री यांना जोडणाऱ्या रस्त्यावर कुमशेत व शिरोली खुर्द
लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : जुन्नर तालुक्यातील अष्टविनायकातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्र ओझर व लेण्याद्री यांना जोडणाऱ्या रस्त्यावर कुमशेत व शिरोली खुर्द या गावच्या शिवेवरील ओढ्यावरील पुलाला संरक्षक कठडेच नाहीत. रस्त्यावर दोन्ही बाजूने उतार व कुमशेत बाजूने धोकादायक वळण असल्यामुळे या पुलावर रात्री अपघात होण्याची शक्यता आहे.
राज्या-परराज्यातून श्री विघ्नहर गणपती व श्री लेण्याद्री गणपती यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची छोटी-मोठी वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. राज्या-परराज्यातून येणाऱ्या भाविकांनी ओझर येथे श्रींचे दर्शन घेतल्यानंतर श्रीक्षेत्र लेण्याद्री या ठिकाणी जाण्यासाठी हाच एकमेव जवळचा मार्ग असल्यामुळे रात्री-अपरात्री या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी या पुलाच्या बाजूला असलेल्या खुरट्या झाडांमुळे हा पूलदेखील दिसत नाही.
कुमशेत, शिरोली खुर्द, तेजेवाडी, शिरोली बुद्रुक येथील गावांचा हा दररोजच्या दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग आहे. कुमशेत येथील शालेय विद्यार्थीदेखील शिरोली बुद्रुक येथे येताना याच धोकादायक पुलावरून येत असतात. या पुलाला संरक्षक कठड्यांना पैसे मंजूर नव्हते की पुलाच्या ठेकेदाराने या कामात काही घपला केला, हा या पंचक्रोशीतील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. या पुलाला तातडीने संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी काँगे्रसचे संघटक रामदास महाबरे व शिरोली बुद्रुक कृषक संस्थेचे संचालक योगेश थोरवे यांनी केली आहे.