पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! टपाल पाकिटावर झळकले पुण्यातील 'हे' ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 09:24 AM2023-12-08T09:24:32+5:302023-12-08T09:25:07+5:30

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे....

Poona Guest House place in Pune appeared on the postal envelope india post | पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! टपाल पाकिटावर झळकले पुण्यातील 'हे' ठिकाण

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! टपाल पाकिटावर झळकले पुण्यातील 'हे' ठिकाण

पुणे : खवय्या पुणेकरांचे हक्काचे ठिकाणं असणाऱ्या, आदबीने प्रत्येकाचे आदरातिथ्य करणाऱ्या आणि कलाकारांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र डाक विभागाच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे टपाल पाकिटावर प्रसिद्ध केले आहे. याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

टपाल विभागातर्फे बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील कलादालनात दोन दिवसीय पुणेपेक्स प्रदर्शनीचे आयोजन केले होते. त्या अंतर्गत गुरुवारी (दि. ७) पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र असलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण करण्यात आले. या वेळी पूना गेस्ट हाऊसचे संचालक अभय व किशोर सरपोतदार, साधना व शर्मिला सरपोतदार उपस्थित होते.

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर पूना गेस्ट हाऊसची भव्य वास्तू गेल्या ९० वर्षांपासून दिमाखात उभी असून हिंदी-मराठी चित्रपट तसेच नाट्य क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ यांसह लाखो पुणेकरांनी पूना गेस्ट हाऊसमधील मराठमोळ्या आणि लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेतला आहे आणि ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे.

१९३५ मध्ये झाली होती पूना गेस्ट हाऊसची स्थापना

पूना गेस्ट हाऊसची स्थापना १९३५ मध्ये मूकपटाचे आद्यनिर्माते, दिग्दर्शक, लेखक कै. नानासाहेब सरपोतदार यांनी केली. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी कै. सरस्वतीबाई सरपोतदार आणि त्यांचे सुपुत्र निर्माते कै. चारुदत्त सरपोतदार यांनी पूना गेस्ट हाऊसची धुरा यशस्वीपणे सांभाळली. कलाकारांचे माहेरघर आणि अस्सल महाराष्ट्रीयन जेवण तसेच खाद्यपदार्थ मिळण्याचे ठिकाण अशी ओळख असलेल्या पूना गेस्ट हाऊसची परंपरा आता तिसऱ्या पिढीचे अभय व किशोर सरपोतदार तसेच साधना व शर्मिला सरपोतदार यांच्या बरोबरीने चौथ्या पिढीतील सनत सरपोतदार हे आधुनिकतेची कास धरून सांभाळत आहेत. त्यांनी पूना गेस्ट हाऊसचा विस्तार मॉल, म्युझियम आणि आयटी क्षेत्रातही केला आहे.

टपाल विभाग आणि इंटरनॅशनल कलेक्टर ऑफ रेअर सोसायटी यांचे कार्य रत्नपारख्याचे आहे. स्वत:चे वेगळेपण जपतानाच इतर संस्थांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी पूना गेस्ट हाऊसची केलेली निवड आणि संस्थेचे छायाचित्र टपाल पाकिटावर प्रसिद्ध करून आमची ओळख देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच जगाच्या पाठीवर होणार आहे. पूना गेस्ट हाऊसला मिळालेला बहुमान आमची जबाबदारी वाढविणारा आणि प्रोत्साहन देणारा आहे-

किशोर सरपोतदार, संचालक पूना गेस्ट हाऊस

Web Title: Poona Guest House place in Pune appeared on the postal envelope india post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.