दि पूना मर्चंटस् चेंबरची यंदा ही ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्री; सलग २८ वर्षे राबविला जातोय उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 06:45 PM2017-10-10T18:45:16+5:302017-10-10T18:46:13+5:30
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्रीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पुणे : सर्वसामान्य व गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्रीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल या दरात ही विक्री केली जाते. यंदा देखील दिवाळीच्या मुहूर्तांवर १४ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ओसवाल बंधू समाज कार्यालय येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते व पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थित ही विक्री सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर बाजारभावापेक्षा निम्या दरात चिवडा व लाडूची विक्री केली जात असल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी माजी अध्यक्ष वालचंद संचेती, उपाध्यक्ष जवाहलाल बोथरा, माजी अध्यक्ष व नगरसेवक प्रविण चोरबेले, अशोक लोढा, विजय मुथा, देवेंद्र अग्रवाल उपस्थित होते. यावेळी ओस्तवाल यांनी सांगितले की, पोहे-खोबरे याचे दर वाढले व जीएसटीमुळे दरवाढ झाल्यानंतर देखील चेंबरच्या वतीने गत वर्षीच्या तलुनेत यंदा कमी दरामध्ये हा चिवडा व लाडूची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांना परवडावे यासाठी लाडू व चिवडा दोन्ही १०५ रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात येणार आहे. सलग पंधरा दिवस तब्बल ५०० कर्मचारी रात्र-दिवस काम करून सुमारे ८५ हजार किलो पेक्षा अधिक चिवडा व लाडू तयार करतात. या उपक्रमाची ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद देखील झाली आहे.
याबाबत बोथरा यांनी सांगितले, की कोणत्याही स्वरुपाची शासकीय मदत न घेता चेंबरचे सदस्य स्वत: बाजारात जाऊन उत्तम दर्जाची हरभरा डाळा, बेसन, साखर, खोबरे, तेल, तुप सर्व मालांची खरेदी करतात. तेसच चिवडा बनविणा-या कर्मचा-यांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना या कामासाठी घेतले जाते. अत्यत रास्त भाव आणि उत्कृष्ट पॅकिंगमुळे पूना मर्चंटस्चा चिवडा-लाडू सर्वसमान्य पुणेकरांकडून दर वर्षी अत्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे बोथरा यांनी सांगितले.
पुण्यात ९ केंद्रांवर होणार चिवडा-लाडू विक्री
पुणेकरांच्या सोयीसाठी दि पूना मर्चंटस् चेंबरच्या रास्त दरातील चिवडा-लाडूची पुण्यातील विविध नऊ ठिकाणी विक्री करण्यात येणार आहे. यामध्ये मार्केट यार्ड येथील दि पूना मर्चंटस् चेंबरचे कार्यालय, शंकरशेठ रोडवरील ओसवाल बंधू समाज कार्यालय, कोथरूड येथील जयश्री आॅईल अॅण्ड शुगर डेपो, हडसर येथे जगदीश ट्रेडिंग कंपनी, कर्वेनगरमध्ये आगरवाल प्रॉडक्ट, टिळक रोडवर नरेंद्र इलेक्ट्रीकल, सिंहगड रोड येथे भगत टेड्रर्स, बिबवेवाडीला आझाद मित्र मंडळ येथे १४ आॅक्टोबर पासून ही विक्री करण्यात येणार आहे.