पुलंच्या आठवणीत रमला ‘मास्टर ब्लास्टर’...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 03:25 AM2018-11-17T03:25:00+5:302018-11-17T03:25:26+5:30
सचिन तेंडुलकरही ‘पुलकित’ : सर्वसामान्यांशी ‘कनेक्ट’ होणे भावले
पुणे : ‘‘माझे वय पाच ते सहा वर्षांचे असेल... बान्द्र्याच्या साहित्य सहवासमध्ये पुल आले होते. मी त्यांची सही घेण्यासाठी रांगेत उभा होतो. ... त्यानंतर २३व्या वर्षी पुन्हा पुलंना भेटण्याचा योग आला. ...पुलंनी मला बोलावले होते. आवडत्या सारस्वत जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला. ...अशा पुलंच्या आठवणींचा गुलदस्ता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने उलगडला. उलगडत होता. डॉन ब्रँडमन यांच्या ९८ व्या वाढदिवसाच्या दिवशी आॅस्टेÑलियाला त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो.’’ ...आज तशीच काहीशी भावना झाली असल्याचे त्याने प्रांजळपणे सांगितले.
सचिनच्या हस्ते ‘ग्लोबल पुलोत्सव’च्या लोगोचे अनावरण शुक्रवारी झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, पुलंचे भाचे दिनेश ठाकूर, ज्योती ठाकूर, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, कृष्णकुमार गोयल, मिलिंद काळे आदी उपस्थित होते.
पिवळा कुडता... पायात कोल्हापुरी चपला अशा मराठमोळ्या वेशभूषेत सचिनने ‘मालती माधव’मध्ये प्रवेश केला. पुलंच्या छायाचित्रासमोर त्याने हात जोडले. ज्योती ठाकूर व विजय मर्चंट यांनी पुलंना लिहिलेल्या पत्रांची माहिती दिली.
सचिन म्हणाला..
माझे बाबा आणि पुल चांगले मित्र होते. बाबांनी मला पुलंची अनेक पत्रे दाखवली आहेत. घरामध्ये पुलंबद्दल सातत्याने बोलले जायचे. त्यांच्याविषयी कुठलीही गोष्ट ऐकली की चेहऱ्यावर हमखास हास्य फुलायचे.
पुल सामान्य माणसाशी कनेक्ट व्हायचे. सर्वसामान्यांशी कनेक्ट होणं ही एक दैवी देणगी असते. तुम्ही तुमच्या करिअरच्या वाटेत कितीही प्रगती करत असाल. परंतु तुम्ही ज्या क्षेत्रात प्रगती करत आहात त्या कलेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना तुम्ही किती आनंद मिळवून देता, हे खूप महत्त्वाचे आहे. पुलंनी सातत्याने त्यांच्या साहित्यनिर्मितीतून सर्वसामान्यांना आनंद दिला. आमच्या पिढीने त्यांच्या साहित्यकृतीचा आनंद घेतला आहे.
४आता सीडी वगैरे गोष्टी मागे पडल्या आहेत आणि डिजिटल युग अवतरले
आहे. आज पाच ते दहा सेकंदात कुठलीही गोष्ट तत्काळ उपलब्ध होते. पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’ची संधी न दवडता तरुण पिढीने त्याचा आस्वाद घ्यावा. आयुष्यभर त्यांच्या आठवणींचा सुगंध दरवळत राहतो.