पूनावालांनी खरेदी केली पुण्यात ४६४ कोटींची प्रॉपर्टी; तेरा मजले घेतले , २८ कोटींचे मुद्रांक शुल्क
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 07:10 AM2021-09-04T07:10:29+5:302021-09-04T07:29:03+5:30
एपी ८१ टॉवर या १९ मजली व्यावसायिक इमारतीमधील तेरा मजले पूनावाला फिनकॉर्प कंपनीने खरेदी केले.
पुणे : पूनावाला फिनकॉर्प या ‘एनबीएफसी’ वित्तसंस्थेसाठी मुंढव्यात ४६४ कोटी रुपये किमतीची इमारत खरेदी केली. प्रिस्टीन प्रॉपर्टीजकडून ही इमारत खरेदी करण्यात आली असून बांधकाम क्षेत्रातला हा अलीकडच्या काळातला पुण्यातला सर्वात मोठा व्यवहार आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय)चे अदर पूनावाला हे मुख्य कार्यकारी अधिकारी असून ते पूनावाला फिनकॉर्प या कंपनीचेही अध्यक्ष आहेत़ त्यांनी कंपनीसाठी या वाणिज्यिक (कमर्शिअल) इमारतीचा खरेदी व्यवहार नुकताच पूर्ण केला. या करिता त्यांनी २७ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले.
एपी ८१ टॉवर या १९ मजली व्यावसायिक इमारतीमधील तेरा मजले पूनावाला फिनकॉर्प कंपनीने खरेदी केले. यापूर्वी कंपनीने याच इमारतीतील पहिला व दुसरा मजला खरेदी केला होता. आत्ताच्या खरेदीमुळे या टॉवरची एक पूर्ण विंग आता पूनावाला यांच्या मालकीची झाली आहे.
प्रिस्टीन प्रॉपर्टीजने सन २०१९ मध्ये एबीआयएल ग्रुपकडून १५० कोटी रुपयांमध्ये येथील ५ एकर जागा खरेदी केली. त्यानंतर अमर बिल्डरशी करार करून येथे १९ मजली इमारत उभारली. या १९ मजली टॉवरच्या एका विंगमधील दहा लाख स्क्वेअर फूट सेलेबल एरियातील ६० टक्के भाग पूनावाला यांच्या ताब्यात आहे. तर ३ लाख २० हजार स्क्वेअर फूट कार्पेट ऑफिस एरिया, ३२० कार आणि ८४९ बाईकसाठी राखीव पार्किंग आहे.