जड दप्तरामुळे विद्यार्थ्यांना जडतोय पाठदुखीचा आजार
By admin | Published: July 8, 2017 02:57 AM2017-07-08T02:57:08+5:302017-07-08T02:57:08+5:30
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याबाबत पालकांबरोबरच शिक्षकही नाराजी व्यक्त करीत आहेत. अनेक मुलांना यामुळे
पुणे : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याबाबत पालकांबरोबरच शिक्षकही नाराजी व्यक्त करीत आहेत. अनेक मुलांना यामुळे लहान वयापासूनच पाठदुखीचे विकार जडत आहेत.
शाळांचे मजले वाढल्याने दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. विद्यार्थ्यांना जड ओझे घेऊन तिसऱ्या- चौथ्या मजल्यावर जावे लागते. यासाठी शाळेतच लॉकरची सुविधा असावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
पहिली ते चौथी हे शिक्षण साधं-सोपं, हसत-खेळत अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजे. लिखाणापेक्षा कृती असली पाहिजे. स्मरणशक्तीवर भर दिला गेला पाहिजे. या काळात घोकंपट्टी करून घेणं गरजेचं नाही; उलट त्यांना वस्तू, प्रयोग दाखवून समजावून दिलं पाहिजे. मूलभूत ज्ञान याच वयात त्यांच्या मनात झिरपलं पाहिजे. म्हणजे आपोआपच पुस्तकांचं, दप्तराचं ओझं कमी करता येईल. पाचवीनंतर मुलांना संकल्पनांवर आधारित शिक्षण द्यायला हवं. त्यात वेगवेगळे फॉरमॅट वापरून शिकवायला हवं. शिकवण्याच्या पद्धती फक्त पुस्तकांवरच आधारित ठेवू नयेत. सध्या काय होतं, की त्याच्या दप्तराच्या ओझ्याने ते अभ्यास करण्यास कंटाळा करतात. - दीपा चव्हाण, शिक्षिका
हल्ली पाल्याऐवजी पालकच दप्तर घेऊन जाताना दिसतात, इतके दप्तराचे ओझे वाढले आहे. मुलांना ते पेलवत नाही. दप्तरात गृहपाठ, रोजच्या वेळापत्रकाप्रमाणे घेऊन जायची पुस्तकं आणि वह्या, अशा अनेक गोष्टी असतात. मुलांनी वेळापत्रकाप्रमाणे पुस्तके, वह्या आणाव्यात, यासाठी आम्ही शाळेत चर्चा करुन उपाय काढण्याचे प्रयत्न करीत आहोत. मुले खासगी शिकवणीला जात असतील तर त्यांना सर्व विषयाची पुस्तकं, वह्या ठेवाव्याच लागतात. त्यामुळे दप्तराचे ओझे इतके वाढते, की मुले कंटाळतात. मुलांचे दप्तराचे ओझे कमी व्हायला हवे. - वर्षा कांबळे, शिक्षिका
वर्ग वाढतोय तसे दप्तराचे ओझेही वाढत चालाले आहे. हे चुकीचे आहे. ओझे कमी करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. जर खरोखरच एवढ्या ओझ्याची गरज असेल, तर मुलांना लॉकर उपलब्ध करून द्या. तिसरीपर्यंत त्यांची क्लासवर्कची पुस्तके शाळेत ठेवून घेत. परंतु, आता मात्र सर्व पुस्तके त्यांना सोबत न्यावी लागतात. भावी आयुष्यात उपयोगी पडतील, असेच विषय अध्यापनासाठी ठेवावेत, म्हणजे अतिरिक्त ओझे कमी होईल.
- लता मोडा, पालक
मुलांच्या दप्तराबाबतचा आदेश शाळांनी गंभीरपणे घेतला नाही. विद्यार्थ्यांनी दप्तरातून किती पुस्तके आणावीत, याविषयी काही धोरण- मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्याने वजन कधी कमी झालेच नाही. हल्ली मुले शिक्षकांच्या भीतीने चित्रकलेच्या वहीपासून सर्व वह्या-पुस्तके दप्तरातून घेऊन येतात. त्यामुळे साहजिकच पाच-सात किलो वजनाचा बोजा त्यांच्या पाठीवर असतो. यासाठी प्रत्येक शाळेने स्वत:चे धोरण ठरविले, त्याची काटेकोरपणे अमलबजावणी केली, तर त्याचा फायदा शेकडो विद्यार्थ्यांना होईल.
- सुनीता कदम, शिक्षिका
अभ्यास कृती वाढलेल्या आहेत. प्रत्येक विषयासाठी काही ना काही उपक्रम दिले जातात. विद्यार्थ्यांकडे पुस्तक नेहमीच असावे, याची गरज नाही. फक्त शिक्षकांकडे असेल तरी चालू शकेल. आपण विद्यार्थ्यांवर फक्त आपल्या मर्जीने ओझे लादतोय
- वंदना ढगे, शिक्षिका
प्राथमिकच्या पहिली ते चौथीच्या पुस्तकांचा आकार हा मोठा करण्यात आला असल्याने ती हाताळणे मुलांसाठी त्रासादायक ठरत आहे. याआधी बालभारतीची लहान पुस्तकेही दोन विभागांत होती. त्यामुळे मुलांना ओझे होते. आता ही भलीमोठी पुस्तके मुलांना दप्तरात भरून आणावी लागतात. परिसरच्या पुस्तकामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान हे सगळे विषय एकत्र करून पुस्तकांची संख्या कमी केली आहे; मात्र आकार आणि पयार्याने ओझेदेखील वाढले आहे. जितकी मोठी शाळा तितके मोठे दप्तर, असे समीकरण झाले आहे. - सरला ओझा, पालक
वेळापत्रकानुसार ठराविक पुस्तके मुलांना शाळेत आणावी लागतात. त्यामुळे मुलांना जास्त ओझे घेऊन फिरावे लागत नाही; मात्र बरीच मुले शाळेनंतर शिकवणीला जातात. त्या पुस्तकांचा बोजा घेऊन शाळेत येतात. मुले ५ वर्षांपर्यंत सर्व आत्मसात करतात म्हणून त्यांच्या डोक्याला एवढा त्रास द्यायला नाही पाहिजे. त्यांना भरपूर खेळून द्या, नाही तर ते लवकर अभ्यासाला कंटाळतील.
- प्रिया गांधी, पालक
माझा मुलगा पाचवीमध्ये शिकत असून रोज शाळेत त्याला क्लासवर्क, होमवर्क, पुस्तके हे घेऊन जावे लागते. मुलाची क्लासरूम शेवटच्या मजल्यावर आहे. रोज शाळेतून आल्यावर तो एकच तक्रार करत असतो, पाठ दुखते म्हणून. रोज त्याला मी स्वत: बसस्टॉपवर घ्यायला जाते. याविषयी आम्ही पालकांनी बऱ्याचदा पालक सभांत हा मुद्दा मांडला; परंतु दप्तराचे ओझ काही कमी होत नाही. यावर शासनाने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. - स्वाती गोडांबे, पालक
मुलांच्या वयाला न पेलणाऱ्या वजनापेक्षाही दप्तर जड झाले आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत केवळ दहा टक्के दप्तराचे ओझे असावे, असा शासनाचा नियम आहे. परंतु, आवश्यकतेपेक्षा जास्त पुस्तके दप्तरात असतात. पुस्तके, वह्या, डबा, वॉटरबॅग, ड्रॉर्इंग बुक घेऊन शाळेत मुलांना जावे लागते. दप्तराचे ओझे जड झाल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पाठदुखीची तक्रारही अनेक मुले करतात.
- ज्योती हराळ, पालक