दोंडकरवाडी पुलाची दुरवस्था, धोकादायकरित्या वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:08 AM2021-07-23T04:08:01+5:302021-07-23T04:08:01+5:30
दावडी-दौंडकरवाडी या पुलाची कित्येक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. शेलपिंपळगाव, आंळदी, चाकणला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर वाहनचालक व नागरिक करत ...
दावडी-दौंडकरवाडी या पुलाची कित्येक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. शेलपिंपळगाव, आंळदी, चाकणला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर वाहनचालक व नागरिक करत असतात. तसेच दावडी, निमगाव परिसरात सेझ प्रकल्प आल्याने अनेक कंपन्यांचा कच्यामालाची या रस्त्याने वाहतूक होते. तसेच अनेक कामगार याच रस्त्याने ये-जा करीत असतात. दावडी परिसरातील शेतकरी चाकण येथे शेतमाल नेण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. हा पूल वाहतुकीसाठी व नागरिकांना ये-जा करण्यासाठी धोकादायक बनला आहे. या पुलाची उंची वाढवावी अशी अनेक वर्षांपासून ग्रामस्थ व वाहनचालकांची मागणी आहे.
याबाबत ग्रामपंचायत दावडी ग्रामस्थांनी हा पूल नव्याने तयार करावा यासाठी वांरवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलाचा मोऱ्या लहान आहेत. मोऱ्याही गाळमातीने बुजून गेल्या आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास ओढ्याला पूर येऊन या पुलावरून पाणी जाते. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प होते. तसेच या पुलावर मोठे मोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी त्यामध्ये साचत आहे. वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात नेहमी होत असतात. पुलाला दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नसल्यामुळे वाहनचालकांना या पुलावरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागते. नवीन येणाऱ्या वाहनाच्या वाहनचालकांला या रस्त्यावरील पुलाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, हिरामण खेसे, संतोष सातपुते यांच्यासह ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.
२२ दावडी
दावडी-शेलपिंपळगाव या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे.