कुसगाव-शिवापूर रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:19 AM2021-03-04T04:19:43+5:302021-03-04T04:19:43+5:30
खेड शिवापूर: भोर- हवेली तालुक्यातील लोकांना वेल्हा तालुक्यात जाण्यासाठीचा सर्वात सोपा व जवळचा मार्ग असलेल्या कुसगाव ते शिवापूर ...
खेड शिवापूर: भोर- हवेली तालुक्यातील लोकांना वेल्हा तालुक्यात जाण्यासाठीचा सर्वात सोपा व जवळचा मार्ग असलेल्या कुसगाव ते शिवापूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाकडे वांरवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, येत्या आठ-दहा दिवसांत रस्त्याचे काम सुरू केले नाही तर रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा कुसगाव गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर(माऊली) मांढरे यांनी दिला आहे.
वेल्हा तालुक्यातील व्यापारी दुग्धव्यवसाय करणारे तसेच सर्वसामान्य नागरी या रस्त्याचा वापर पुणे शहराकडे येण्या-जाण्यासाठी करत असतात त्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र सध्याची रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करणे जिकरीचे झाले असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
सुमारे २० वर्षांपूर्वी माजी आमदार कै. काशिनाथ खुटवड यांच्या आमदार फंडातून सदर रस्त्याचे काम केले होते. त्यानंतर या रस्त्याकडे ना कोणता पदाधिकारी लक्ष देत आहे ना लोकप्रतिनिधी. त्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. १९९९ च्या दरम्यान, माजी आमदार कै. काशिनाथ खुटवड यांच्या आमदार फंडातून या रस्त्याचे काम झाले त्यानंतर या रस्त्याची फक्त वरच्यावर मलमपट्टीच करण्यात आली आहे. वारंवार रस्त्याबाबत आम्ही पाठपुरावा करत आहोत, पण त्याकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. तसेच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय व इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे पुणे जिल्हा पोल्ट्री संघटनेचे उपाध्यक्ष अशोक वाडकर यांनी सांगितले.
रस्त्याच्या कामासंदर्भात वारंवार नियुक्त ठेकेदारास सूचना करूनही ठेकेदार काम चालू करत नाही. कोरोनामुळे संबंधित ठेकेदाराचे बिल थकीत होते. मात्र येत्या आठवड्यामध्ये आम्ही हे काम कसल्याही परिस्थितीत चालू करण्यास सांगू व पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करून घेऊ.
- एच. बी. चौगुले, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
०३ खेड शिवापूर रस्ता
कुसगाव ते शिवापूर दरम्यानच्या रस्त्याची झालेली दुरवस्था.