वेल्हे तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:14+5:302021-07-19T04:08:14+5:30
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वेल्हे-केळद रस्त्यावर तर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की, रस्त्यात ...
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वेल्हे-केळद रस्त्यावर तर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की, रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हेच समजेनासे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. केळद रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत असून कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा केळदचे सरपंच रमेश शिंदे यांनी दिला आहे.
वेल्हे तालुक्यातील वेल्हे ते चेलाडी या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्ते खचले आहेत. तर पावसाळ्यापूर्वी दोन्ही बाजूची गटारे स्वच्छ करावयाची होती ती स्वच्छ न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन वाहने घसरण्याच्या प्रमाणात वाढ होऊन अनेक अपघात झाले आहेत. तर अनेकांना दुखापत झाली आहे. तसेच मार्गासनी ते वाजेघर रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे चिकट माती रस्त्यावर आली आहे. या रस्त्यावर कोठेही गटारे स्वच्छ केलेली नाहीत. गटारांमध्ये माती साठली आहे. तर साखर येथे एका किराणा दुकानासमोर रस्ता खोदला असल्याने या ठिकाणी डबके तयार झाले आहे. त्यामुळे वाहने रुतून अपघात होत आहेत.
पाबे ते खानापूर रस्त्याचे देखील काम सुरू असून पाबे गावाकडून घाट चढताना सुरू झालेल्या रस्त्यावर देखील सर्व माती व पाणी रस्त्यावर येत आहे. घाटावरील रस्त्यावर पावसाच्या पाण्याने राडारोडा रस्त्यावर आला आहे. या रस्त्याच्या बाजुने गटारांची स्वच्छता होणे आवश्यक आहे, अशी मागणी येथील प्रवाशी करत आहेत.
वेल्हे ते केळद रस्त्यावर तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही. भट्टी येथील उतारावर मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणी अनेक वेळा दुचाकीस्वार पडले असून अपघात झालेले आहेत. तरीदेखील सार्वजनिक विभागाने या ठिकाणी खड्डे बुजविले नाहीत.
कासुर्डी ते चिरमोडी रस्त्याचे देखील काम अतिशय निकृष्ट झाले असल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत. तर राजगडाकडे जाणारा साखर ते वाजेघर रस्त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर करंजावणे ते कुसगाव रस्त्यावरील कुसगाव खिंडीच्या ठिकाणी उतारावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
१८ मार्गासनी रस्ता
केळद खिंड (ता. वेल्हे) येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.