राज्य महामार्गाची काळखैरेवाडीनजीक दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:37+5:302021-08-15T04:12:37+5:30
हा ६२ क्रमांकाचा राज्य महामार्ग आहे. येथून दौंड, शिरूर, हवेली, फलटणसह साताऱ्याकडे जाणारा मधला व जवळचा मार्ग आहे. त्यामुळे ...
हा ६२ क्रमांकाचा राज्य महामार्ग आहे. येथून दौंड, शिरूर, हवेली, फलटणसह साताऱ्याकडे जाणारा मधला व जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गाने सतत वाहनांची वर्दळ असते. मागील दोन वर्षांपासून काळखैरेवाडीपासून बाबुर्डीकडे जाणाऱ्या ८०० मीटर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. या रस्त्याचे डांबरीकरण उखडले असून जागोजागी खड्ड्यांची चाळण तयार झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी मुरुमीकरण करून रस्त्याची मलमपट्टी केली होती. मात्र, मागील वर्षीच्या पावसातच या रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे. या ८०० मीटर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकी चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरचे खड्ड्यांकडे लक्ष द्यावे तर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. विशेषत: रात्रीच्या वेळी खड्ड्यांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशाने दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व्ही. एम. ओव्हाळ यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, येत्या पंधरा दिवसांत या कामाला सुरुवात होणार आहे.
----------
फोटो- सुप्याकडून लोणी पाटीकडे जाणाऱ्या रस्त्याची काळखैरेवाडीनजीक दुरवस्था झाली आहे.
फोटो- दीपक जाधव, सुपे
टिप - फोटो मेलवर पाठवला आहे.