तुपे पाटील उद्यानाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:10 AM2021-03-08T04:10:24+5:302021-03-08T04:10:24+5:30
खासदार स्व. विठ्ठलरावजी तुपे पाटील उद्यानामध्ये राडारोडा, कचरा, तुटलेले प्रवेशद्वार, अस्ताव्यस्त बांधकाम साहित्य पडलेले आहे. अनेक वर्षांपासून या उद्यानाचे ...
खासदार स्व. विठ्ठलरावजी तुपे पाटील उद्यानामध्ये राडारोडा, कचरा, तुटलेले प्रवेशद्वार, अस्ताव्यस्त बांधकाम साहित्य पडलेले आहे. अनेक वर्षांपासून या उद्यानाचे काम सुरू असले, तरी ते काम कधी पूर्ण होणार ? याबाबत अद्याप तरी अनिश्चितता दिसत आहे. हे उद्यान त्वरित चांगले करून ते नागरिकांसाठी खुले करावे अशी मागणी होत आहे.
मगरपट्टा-मुंढवा-माळवाडी (प्रभाग क्र.22) मध्ये लक्ष्मी कॉलनी येथे दोन्ही कालव्यांमधील जागेत खासदार स्व. विठ्ठल तुपे पाटील नावाने उद्यान सात वर्षांपासून विकसित करण्याचे काम सुरू आहे. या उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, जॉगिंग ट्रॅक, अॅम्पी थिएटर, कारंजे धूळखात पडले आहे. उद्यानात राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकला गेला आहे. पदपथावर गवत उगवले आहे, झाडांची लागवड केली असली तरी, त्याची देखभाल केली जात नसल्याने उद्यानाला बकालपणा आला आहे. त्यामुळे उद्याना नागरिकांऐवजी आता मोकाट कुत्री फिरत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरूनच नागरिकांना परतावे लागत आहे. मद्यपींसाठी हे हक्काचे ठिकाण बनले आहे. नागरिकांसाठी याचा मात्र काहीच उपयोग होत नाही.
उद्यानामध्ये राडारोडा आणि कचराकुंडी झाल्यामुळे चोरट्यांना लपण्यासाठी माहेरघरच बनले आहे. पालिका प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या उद्यानाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
उद्यानाच्या बाजूने कालव्याच्या भरावावर गंगानगरकडे जाण्यासाठी तयार रस्त्यावर केलेल्या रस्त्यावर राडारोडा टाकल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले आहे. तसेच मुंढवा जॅकवेलमधूनही बेबी कालव्याद्वारे खुटबावपर्यंत शेतीला पाणी सुरू आहे. या दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मच्छरांचा त्रास काहीसा कमी झाला आहे. कालव्यातून पाण्याचा विसर्ग बंद झाला की, कालव्यात पाण्याची डबकी साचतात आणि डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, थंडी-तापासारख्या आजारांचा त्रास कालव्यालगतच्या नागरिकांना सहन करावा लागतो. पाटबंधारे विभागाने कालव्यालगतची अतिक्रमणे हटवून कालव्याची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
पालिकेच्या उद्यान विभागाचे उद्यान निरीक्षक करडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.